Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

परंपरा आणि आधुनिकतेचे संघर्षनाट्य – प्रा.राजकुमार मुसणे

सासूच्या घरात सुनबाई जोरात  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

रंगवैभव रंगभूमीचे प्रा.आनंद भिमटे लिखित, चेतन वडगाये दिग्दर्शित, निर्माता मयूर बोरकर, सूत्रधार अरविंद झाडे यांचे ‘ खुन्नस ‘ अर्थात ‘सासूच्या घरात सुनबाई जोरात’ या नाटकाचा प्रयोग नुकताच महिपालसिंग बाबा युवा मंडळ द्वारा २ डिसेंबरला कोठारी,जि.चंद्रपुर येथे संपन्न झाला.

सासू आणि सून यांच्या जीवनावर आधारित कौटुंबिक नाटय , सासु व सुनेच्या नात्यातील संघर्ष , पत्नी आणि आईच्या कचाट्यात अडकलेल्या पोलीस विभागात अधिकारी असलेल्या पती आणि मुलाची व्यथा म्हणजे हे नाटक आहे. छोट्याशा प्रसंगावरूनही आपुलकीच्या नात्यात दुरावा निर्माण होऊन संघर्ष पेटला तर तो किती टोकाला जाऊ शकतो, याचे प्रत्यंतर म्हणजे हे नाटक आहे.

गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या एका सर्वसामान्य कुटुंबातील प्रामाणिक, कर्तव्यदक्ष, पोलीस अधिकारी असलेल्या अनिलचा विवाह रूपवान, सौंदर्यवती घनश्याम शेठजीची शिक्षित मुलगी मीना हिच्याशी होतो. सासू गंगा व सून मीना या दोन पिढ्यातील दोघी प्रतिनिधी. सासू परंपराप्रिय, धार्मिक, आस्तिक, धार्मिकतेच्या जोखडाखाली वाढलेली .तोच प्रभाव तिच्या मनावर कायम असतो. सून आधुनिक विचाराची. बिनधास्त , फॅशनेबल जगणारी, स्वत:च्या अस्तित्वाला प्राधान्य देणारी स्वतंत्र विचाराची आहे. मुलगी मंजू ही पोलीस असलेल्या मुस्लीम धर्मीय शकीलशी कोर्टाद्वारे प्रेमविवाह करते. हे गंगुला कदापिही मान्य होत नाही. ती मंजूचा धिक्कार करीत घराबाहेर हाकलते. तद्वतच सून मीनाही आधुनिक स्वतंत्र विचाराची , पार्टीत दारू पिणारी, मटन खाणारी, लहान कपडे परिधान करणारी, टिकली न लावणारी, मंगळसूत्र न घालता बिनधास्त फॅशनेबल वावरणारी. मात्र परंपरा प्रिय सासूला हे सर्व खटकते. एका मैत्रिणीच्या पार्टीतून सून आधुनिक वस्त्राच्या अवतारात व मुलगा मद्य प्राशन केलल्या अवस्थेत येतात.हे दृष्य पाहून परंपराप्रिय गंगूच्या तळपायाची आग मस्तकात जाते. इथूनच वादाची ठिणगी उद्भवते. सासूने थापड मारल्याचे जिव्हारी लागल्याची खुन्नस , सासू – सुनेचा वाद चव्हाट्यावर येतो, सून घर सोडून माहेरी जाते.

अनिलची अवस्था सासू आणि सुनेच्या मध्ये चेंडूसारखी होते. पत्नीचे ऐकले तर आई बायकोचा बैल म्हणून निर्भत्सना करते. सून सासूने केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी , सूड उगवण्यासाठी, खुन्नस काढण्यासाठी पुढाकार घेते. त्यात आरोप-प्रत्यारोपाने कौटुंबिक कलह विकोपाला जातो.सून डान्स करते, सिगारेट ओढत धूर सासुकडे भिरकावते, मारहाण करते, चाकूने स्वतःच्या हातावर स्वतःच वार करते; मात्र पोलिसात जाऊन गंगूबाईविरुद्ध खोटी तक्रार देते. 20 लाख हुंड्याचा आरोप, भ्रष्ट अधिकारी म्हणून निलंबन,अनिल यशवंत हाणामारीत घनश्यामशेठचा मृत्यू, नवऱ्याला स्वतःच्या बाळाला हातही लावू न देणे, असे प्रसंग हृदय पिळवटून टाकणारे आहेत. शकील मीनाचे कारस्थान उघडकीस आणतो. बायको असून एकाकी, आई असून अनाथ अनिल

गृहकलहातील आई -पत्नीच्या भांडणात भरडला जातो. त्याच्यावर लाचखोरीचा खोटा आरोप होतो, त्यामुळे त्याचे निलंबन होते. नैराश्याने ग्रासलेला अनिल व्यसनाधीन होतो. अनीलची व्यथा भयावह असून कशासाठी जगतो मी ? म्हणत अनिलने मांडलेले आक्रंदन व कारुण्य विचारप्रवर्तक आहे.आयुष्यातील सुंदर नाती दुरावतात अन् जीवनातली सुंदरताच हरवते असा आशय व्यक्त होतो.

धर्मनिरपेक्षता हे मूल्य स्वीकारलेल्या देशात धार्मिक वाद होऊ नयेत, सर्वांनी प्रेमाने वागावे हे सांगताना नाटककाराने मुस्लिम धर्मीयातील कर्तुत्ववान व्यक्तीच्या योगदानाचे स्पष्टीकरण दिले आहे. मोहंमद इकबाल, शहाजहान, टिपू सुलतान, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी देशासाठी केलेल्या मौलिक कार्याची जाणीव करून दिली जाते. मुस्लिम धर्मीय पोलीस शकील आपल्या मुलाचे नाव शिवबा ठेवतो. अशा प्रसंगातून जातीय व धार्मिक द्वेषावर पांघरून घालत सहिष्णुतेने, धार्मिक एकोप्याचा संदेश नाटकातून दिला आहे.

नाटकातील गीतेही प्रयोगाच्या यशस्वीतेत भर घालणारी आहेत.

‘तुटली सारी नाती गोती.. नाते तुटले मायेचे’,

नेतो फिराया टेन्शन घ्यायचा नाय, काय तो डोंगर काय ती झाडी, काय ते हॉटेल, सगळं कसं ओके हाय’, कशी चढली मला नशा या धुंद प्रेमाची ,अयो रामा लफड्यात फसलो ना , झुळुक आली वाऱ्याची हाती हाथ दे ना मला, झाले गेले विसरून जाणे,हम तेरे शहर मे आये, घोरपड सरड्याचे लगीन… वऱ्हाडी कोण कोण, गाढव म्हणे मी आहे साला, भाटो कुत्र्यावर आला, आली वरात, धसली घरात नवरीच्या बापाला खूप मोठा तरास, ‘सासु सुनेचा वाद पेटला घराचे स्मशान झाले, घरचे भांडण चव्हाट्यावर आले, इज्जत गेली ,अब्रूही गेले,साऱ्या गावात चर्चा झाली,’ अशा आशयवाहक बहारदार गीताने, स्वरसम्राट शुभम मसराम यांच्या सुमधूर गायनाने प्रयोगाला चांगलीच रंगत आणली.

नाटकातील विनोद हा तर अत्यंत महत्त्वाची जमेची बाजू. गफलत्या, बोनस, डब्ल्यूडब्ल्यूई , कुकुडहांजीच्या, कापरीगोधी, पायाने लंगडी आहे पण चालते, सन्न गाडी दन्न पीकअप, चिमणी, दाणे, एंगेज बोर्ड, सेंट्रीग, पंचर गाडी, सामान विकला कोणाला बिल माझ्या नावानं फाडते,गोपालकाला, राशनच्या दुकानात बायलर उपलब्ध, लग्नाचे खुमासदार वर्णनाने व संवादानी प्रेक्षक मस्त हसतात. सुमित्रा – बोन्या प्रेम गीत, मनोजचे धक्का तंत्रातील चतुराईने प्रेक्षकाना लोटपोट हसवत खुर्चीला खिळवून ठेवण्यात विनोदवीर चेतन वडेखाये, कीर्ती मरसकोल्हे व अरविंद झाडे यशस्वी ठरले. शकील (शुभम मसराम), इन्स्पेक्टर अनिल (अनुप बहाळ), घनश्याम शेठ (विश्वनाथ निळे सर), यशवंत (अंकुश गवळी),बोन्या (चेतन वडेगाये), मनोज (अरविंद झाडे), मंगेश (मयूर बोरकर), मीना (कीर्ती आवळे), मंजू (करिष्मा मेश्राम) गंगाबाई (सपना मोटघरे) आणि सुमित्रा कीर्ती मरसकोल्हे यांच्या सकस अभिनयाने नाट्यप्रयोग जिवंतपणे साकारला.

 ऑर्गन स्वप्नील गेडाम, आक्टोपॅड अभिजीत पिल्लारे,तबला प्रवीण डुंबरे यांच्या संगीत साथीमुळे प्रयोगात चांगलीच रंगत आली. अंक अखेरीस दिलेल्या संगीताच्या योग्य संयोजनाने झाडीपट्टी रंगभूमीची उंची वाढलेली जाणवते.

गंगा आणि मंजू मधील खुन्नस, सासूचा कांगावा, सुनेचा अतिरेक, अनिलची संभ्रमावस्था,अनिल – यशवंतचे भांडण, बोन्या- मनोज आणि सुमित्रा मधील हसून लोटपोट होत जाणारा विनोद, कोंबडा चोर प्रसंग, विवाह प्रसंग अनुभव घेण्यासाठी नाटक पाहायला हवेच.

उमदे कलाकार,पाठांतर, बिनधास्त अभिनय, गतिमानतेने नाटक रंगत जाते.कौटुंबिक नाट्य, सासू -सुनेचा कचाट्यात सापडलेल्या एकासुशिक्षित अधिकाऱ्याची दैन्यावस्था, हिंदू – मुस्लिम धार्मिक द्वेष, या ज्वलंत सामाजिक विषयाला नाटककार आनंद भिमटे यांनी हात घालत सामाजिक प्रबोधन केले आहे.

हिंदू – मुस्लिम या धार्मिक वादामुळे नेहमी उद्भवणाऱ्या ज्वलंत समस्येलाही लेखकाने न्याय देण्याचा केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. कौटुंबिक विषयातील सामाजिक प्रबोधनाला विनोदाची उत्तम झालरीची गुंफण असलेल्या खुन्नस अर्थात सासूच्या घरात सुनबाई जोरात या नाटकाने 225 पेक्षाही अधिक यशस्वी प्रयोगाद्वारे झाडीपट्टीत इतिहास रचला आहे. एकंदरीत कौटुंबिक, समस्याप्रधान, सासू-सुनेच्या संघर्षाचें, सुडाचे नाट्य प्रत्येकाने आवर्जून बघावे असेच आहे.

प्रा.राजकुमार मुसणे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये