ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राळेगावजवळ सिमेंटच्या होमपाईपमध्ये अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

माजरी पोलिसांचा तपास सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          माजरी पोलीस ठाणे अंतर्गत राळेगाव परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पाटाळा नदी पुलाजवळील पाटाळा शेतशिवारात राळेगावकडे जाणाऱ्या सर्व्हिस रोडलगत सिमेंटच्या होमपाईपमध्ये हा मृतदेह बुधवारी (दि. २८ मे) सकाळच्या सुमारास आढळून आला.

याबाबतची माहिती राळेगावचे पोलीस पाटील दिवाकर ढोले यांनी माजरी पोलिसांना फोनद्वारे दिली. माहिती मिळताच माजरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचांसमक्ष स्थळ पंचनामा केला.

तपासादरम्यान मृत महिलेच्या जवळ आधार कार्ड तसेच काही मोबाईल क्रमांकांच्या चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यावरून चौकशी केली असता सदर महिला चंद्रपूर शहरातील लालपेठ कॉलरी क्रमांक १ येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. मिळालेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधल्यानंतर तिचा मुलगा मनोज व्यंकटी सुलकारी याने मृत महिला ही आपली आई राधाबाई व्यंकटी सुलकारी असल्याचे ओळख पटवून दिली.

दरम्यान, राधाबाई सुलकारी या बेपत्ता असल्याची तक्रार यापूर्वीच चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे पाठविण्यात आला असून तपास पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.

या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांनी घटनास्थळी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या. पुढील तपास पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा आणि माजरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि हरिदास चोपने करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये