सेलू शहरात अवकाळी पाऊस व तुफान वाऱ्याने मोठे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
सेलू : दि. 28 मे 2026 रोजी दुपारी 3.30सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार तुफानी वाऱ्यामुळे सेलू शहरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. विशेषतः विकास चौक परिसरात अनेक टपरी दुकाने उध्वस्त झाली असून काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुफानी वाऱ्यामुळे रस्त्यालगत असलेल्या छोट्या व्यावसायिकांच्या टपऱ्यांचे पत्रे उडून गेले तसेच काही दुकाने पूर्णपणे कोसळली. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला.
विकास चौक परिसरात वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. नागरिकांनी प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी केली आहे. तसेच शहरातील धोकादायक झाडांची छाटणी करून भविष्यात अशा दुर्घटना टाळाव्यात अशीही मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.



