निवृत्त शिक्षकांऐवजी नवीन तरुणांना संधी द्यावी : अल्का आत्राम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
महाराष्ट्रात जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्यामुळे शासनाने निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर पुनर्नियुक्ती देण्याबाबत नवीन परिपत्रक जारी केले आहे. मात्र या निर्णयाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अल्का आत्राम यांनी वेगळा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडे, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मागणी केली आहे की निवृत्त शिक्षकांऐवजी नव्या तरुण शिक्षकांना संधी द्यावी.
अल्का आत्राम म्हणाल्या की, निवृत्त शिक्षक अनुभवी असून त्यांच्या ज्ञानाबद्दल कोणतीही शंका नाही; मात्र ते आधीच पेन्शनधारक आहेत. दुसरीकडे अनेक तरुणांनी डी.एड., बी.एड. सारखी शिक्षण पदवी मिळवूनही ते बेरोजगार आहेत. त्यामुळे त्याच मानधनावर नव्या युवकांना कामाची संधी दिल्यास त्यांच्या हाताला रोजगार मिळेल आणि शिक्षण व्यवस्थेलाही फायदा होईल.
त्या पुढे म्हणाल्या की आजची तरुण पिढी तंत्रज्ञानाशी अधिक जोडलेली आहे. त्यामुळे आधुनिक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात तरुण शिक्षक अधिक प्रभावी ठरू शकतात. अनेक ठिकाणी भेटीदरम्यान असे दिसून आले की, जिथे नवीन तरुण शिक्षक कार्यरत आहेत तिथे शैक्षणिक उपक्रमांना अधिक गती मिळते.
यासोबतच अनेक तरुणांनी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहून मेहनत घेतली, पदवी प्राप्त केली आहे. अशा तरुणांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा अल्का आत्राम यांनी व्यक्त केली असून या मागणीसाठी त्यांनी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.



