ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरुदेव सेवा मंडळात रंगले झाडीबोली कवी संमेलन : २५ कवींचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     अ.भा. श्री गुरुदेव सेवा मंडळ गडचिरोली शाखा आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात नुकतेच झाडीबोली कवी संमेलन पार पडले.

    अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते.व्यसनांची भयावहता या विषयावर उपस्थित २५ कवींनी आपल्या स्वरचित रचना प्रस्तुत केल्यात. माजी प्राचार्य पंडित पुडके, नशाबंदी मंडळाचे संदीप कटकुरवार, ३१ व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत लेनगुरे,झाडी बोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा.विनायक धानोरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

  यावेळी बंडोपंत बोढेकर म्हणाले, आपल्या शरीर संपत्तीचे रक्षण करणे हे प्रत्येकांचे आद्य कर्तव्य आहे. म्हणून आपले शरीर दुर्व्यसनांने मातीमोल करू नका. व्यसनांच्या आहारी गेल्याने शारीरिक व मानसिक हानी होत असते. राष्ट्रसंतांनी व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रभावी साहित्य निर्माण करून ठेवल्याचे ते म्हणाले.

       कवी संमेलनांत ज्येष्ठ कवी एकनाथ बुद्धे (विसोरा)यांनी बेवड्याची व्यथा ही विनोदी कविता ऐकवली तर खेमदेव हस्ते, रोशनी दाते,किशोर मलेवार यांनी व्यसनांचे दुष्परिणाम संदर्भातील कवीतांचे वाचन केले. रस्त्यानं दारूड्या दिसला ही झाडी कविता प्रमिला अलोणे यांनी ऐकवली तर गजानन गेडाम , नत्थुजी चिमूरकर, हितेश राठोड, रोशनी दाते, यामिनी मडावी यांनी आपल्या कवितेतून व्यसनमुक्तीचा विचार मांडला.

पी.डी. काटकर, मंगला कारेकर, आनंद बावणे, वंदना सोरते, चेतन ठाकरे, मधुकर भोयर यांच्या रचना व्यसनमुक्तीपर रचना युवकांना मार्गदर्शनपर होत्या. विनोदी कवी उकंडराव राऊत (पोर्ला)यांनी दारूची नशा हा पोवाडा सादर केला तर वसंत चापले यांनी दारुड्याचा पाळणा गायला. बी. के. राजूभाऊ, मधुकर भोयर,देवराव भोगेवार, रमेश फुकटे, नत्थुजी दखने (घाटी), डॉ. लेनगुरे, वसंत कुलसंगे आदींच्या कविता व्यसनांची गंभीरता प्रस्तुत करणा-या ठरल्या. झाडी गौरव गीतांचे गायन प्रा. धानोरकर यांनी केले.

सूत्रसंचालन उपेंद्र रोहनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन पंडित पुडके यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये