ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत भद्रावतीच्या अनेक समस्या

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत प्रवीण चीमुरकर यांनी समस्यांचा वाचला पाढा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विस कलमी सभागृहात प्रत्येक महिन्यात होत असते. या बैठकीत जिल्ह्यातील अनेक तक्रारी, समस्या यावर चर्चा होत असते. नुकत्याच झालेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत ग्राहक पंचायत चे सहसचिव तथा जिल्हा ग्राहक परिषदेचे सदस्य प्रवीण रामचंद्र चीमुरकर यांनी भद्रावती येथील अनेक समस्यांचा पाढा जिल्हाधिकारी यांचे समोर वाचला.

नगरपरिषद भद्रावती येथे अनेक ले आऊट मध्ये मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. त्यापैकी बगळेवाडी ले आऊट, ओंकार ले आऊट यामध्ये ले आऊट मालकाने प्लॉट विकते वेळी करारनाम्यात लिहून दिलेल्या नागरी सुविधा जसे नाल्या, रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, इलेक्ट्रिक जोडणी, गार्डन इ. करून दिल्या नाहीत. याबद्दल ग्राहकांनी लेआऊट मालक, नगरपरिषद भद्रावती च्या मुख्याधिकारी यांचेकडे वारंवार तक्रारी करून सुद्धा उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे प्रवीण चीमुरकर यांनी याबद्दल संपुर्ण माहीती ग्राहक संरक्षण परिषदेत सादर केली. तसेच एस.के.मल्टीपर्पज ॲन्ड महाऑनलाईन सेवा केंद्रात पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी गेलेल्या जेष्ठ नागरिकांच्या बँक खात्यातून परस्पर पैसे गहाळ करणाऱ्या महाऑनलाईन सेवा केंद्राचे लायसन्स रद्द करण्याची मागणी केली.

चंद्रपूर जिल्ह्यातील खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनास ऑनलाईन परमिट मिळत नसल्याने वाहन मालकाला होत असलेल्या समस्यांची जाणीव करून ऑनलाईन परमिट चालु करण्याची मागणी केली.

जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात रूग्णाला लिहुन दिलेल्या तपासणी जसे रक्त तपासणी, एक्स रे, सोनोग्राफी इ. डॉक्टरांनी दिलेल्या सेंटरवर किंवा त्यांच्याच दवाखान्यात करण्याची सक्ती नसावी. रूग्ण ग्राहकांना त्यांच्या इच्छेनुसार तपासणी करण्याचा तसेच औषधी विकत घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे रूग्णांना या रूग्णालयात तपासणी करणे किंवा औषधी खरेदी करण्याची सक्ती नाही असे फलक दर्शनी भागावर लावण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.

एल.आय.सी. कार्यालय वरोरा यांच्याकडे अनेक शिक्षक, शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालयात काम करणाऱ्या नागरिकांच्या पॉलिसी आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांची पॉलिसी रक्कम थेट त्यांच्या पगारातून कापली जाते व ती एल.आय.सी. कडे जमा होते. परंतु एल.आय.सी. कार्यालय, वरोरा यांच्याकडे ग्राहकांची जमा झालेली रक्कम ती ग्राहकांच्या खात्यात जमा व्हायला दोन ते तीन महीने लागतात. एल.आय.सी. कार्यालयाला ऐवढा वेळ का लागतो? ग्राहकांची पॉलिसी ची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यात जमा होईल अशा उपाययोजना करण्याची मागणी केली.

वसंत ॲग्रोटेक, अकोला या कंपनी ने विकलेले बियाण्यांची उगवन क्षमता १-२ टक्के असल्याच्या शेतकऱ्याच्या तक्रारी वरून वसंत ॲग्रोटेक अकोला या कंपनी वर कारवाई करण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मागील प्राप्त तक्रारींचा आढावा घेत नविन प्राप्त ग्राहकांच्या सर्व तक्रारी वर कारवाई करून तक्रारी चे निराकरण करण्याचे आदेश दिले.

ग्राहकांच्या अशा अनेक समस्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत प्रवीण चीमुरकर यांनी जिल्हाधिकारी यांचे समोर मांडल्या. यावेळी बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अन्न धान्य वितरण अधिकारी, कृषी उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी, बी.एस.एन.एल चे सहाय्यक महाप्रबंधक, वैद्य मापण शास्त्र विभागाचे अधिकारी यांच्यासह जिल्हा ग्राहक परिषदेचे सदस्य तथा अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये