भारतीय जनता पक्ष म्हणजे विचार, संस्कार आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रवास – आ. जोरगेवार
नकोडा येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

चांदा ब्लास्ट
आजचा दिवस नकोडा गावासाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी ऐतिहासिक आहे. आज नकोडा येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून एक विचार, एक संस्कार आणि एका राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाशी स्वतःला जोडले आहे. पक्ष बदलणे म्हणजे केवळ ध्वज बदलणे नव्हे, तर तो विचारांचा स्वीकार असतो. आज आपण भारतीय जनता पक्षाच्या कार्यसंघात सामील झालात, तेव्हा तुम्ही फक्त एका पक्षात नाही तर सेवा, राष्ट्रभक्ती आणि विकासाच्या प्रवासात सहभागी झाले असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
शनिवारी नकोडा येथील असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नकोडा येथे आयोजित या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, जिल्हा संघटन महामंत्री नामदेव डाहुले, भाजप तालुका अध्यक्ष विनोद खेवले, भाजप नेते प्रकाश देवतळे, घुग्घूस शहर महामंत्री इमरान खान, भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अनुप भंडारी, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, आशिष माशिरकर, राकेश पिंपळकर, दुर्गा वैरागडे, भाग्यश्री हांडे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा केवळ सत्तेसाठीचा पक्ष नाही, तो संस्कार, सेवा आणि संघटनेचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची ओळख जागतिक पातळीवर मजबूत झाली आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य प्रगतीची नवी उंची गाठत आहे. जनतेच्या जीवनात परिवर्तन घडविणाऱ्या योजना गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, शेतकरी सन्मान, उज्ज्वला, जनधन, प्रधानमंत्री आवास, आयुष्मान भारत अशा अनेक उपक्रमांद्वारे आज सबका साथ सबका विकास हे ब्रीद वास्तवात उतरले आहे.
नकोडा आणि परिसरात आम्ही विकासाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. आज भारतीय जनता पक्षात सामील होणारे हे सर्व कार्यकर्ते म्हणजे नवीन ऊर्जा आणि नवसंजीवनी आहेत. तुमचा हा निर्णय केवळ राजकीय नाही, तर सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने उचललेले पाऊल असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा ओढून त्यांचे पक्षात स्वागत केले.
काँग्रेसला खिंडार – विजय बावरे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश
मागील काही महिन्यांमध्ये काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. शनिवारी नकोडा येथे झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात पडोलीचे विजय बावरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विजय बावरे यांच्या पत्नी शारदा बावरे यांनी २०१७ च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. त्यामुळे आता विजय बावरे यांच्या प्रवेशामुळे ग्रामीण भागात पक्षाची ताकद वाढणार आहे.



