प्रभू श्रीरामाच्या आक्षेपार्ह पोस्टला लाईक व कॉमेंट करणाऱ्या आरोपीस अटक
निषेधार्थ भद्रावती शहरात कडकडीत बंद : निषेधार्थ निघाली श्रीराम भक्त हिंदूंची भव्य निषेध रॅली
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पुण्याच्या बंद असलेल्या फेसबुकवरील एका अकाउंटला ॲक्टिव करून त्यावरील श्री प्रभू रामचंद्र, सीतामाता तथा हनुमानाबद्दल व्हायरल करण्यात आलेल्या अश्लील व आक्षेपार्ह पोस्टला लाईक करून त्यावर कॉमेंट्स करणाऱ्या भद्रावती येथील प्रकाश महादेव रामटेके या समाजकंटका वर पोलिसात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आल्याची माहिती भद्रावती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. या आक्षेपार्ह पोस्टमुळे भावना दुखावलेल्या शहरातील समस्त हिंदू बांधवांनी एकत्र येत दिनांक 28 रोज रविवारला शहर बंदची आव्हान केले. त्याला मोठा प्रतिसाद देत भद्रावती शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला.
शहरातील बाजारपेठा पूर्णता बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान शहरातील सर्वपक्षीय हिंदू बांधवांनी व नागरिकांनी एकत्र येत शहरात निषेध मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला व यापुढे अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाही असा इशाराही दिला. या गैर कृत्यामध्ये प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. फेसबुक वर असलेल्या पुण्याच्या एका अकाउंटचा आरोपी हा सदस्य आहे. या अकाउंट वर श्री प्रभू राम, सीतामाता व हनुमानाबद्दल आक्षेपार्ह व अश्लील पोस्ट टाकण्यात आल्या होत्या. या पोस्टला सदर आरोपीने लाईक करून कॉमेंट केले व या पोस्ट अन्यत्र फॉरवर्ड केल्या. त्यावर अन्य काही व्यक्तींनी सुद्धा कमेंट्स केले यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या. याची तक्रार भाजपचे शहर महामंत्री प्रशांत डाखरे यांनी भद्रावती पोलिसात केली. त्यानुसार भद्रावती पोलिसांनी प्रकाश महादेव रामटेके याचेवर संबंधीत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाची सांगता नगर परिषद कार्यालयाजवळ करण्यात आल्यानंतर सभा घेण्यात आली. दोषी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्याबरोबरच यापुढे हिंदु देवदेवतांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही यावेळी समाजकंटकांना देण्यात आला.