ग्रामीण भागातील विद्युत पुरवठा अंडरग्राउंड करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना : ग्रामीण भागात वारंवार होणारे वादळ, जोरदार वारे, पावसाळ्यातील झाडे पडणे तसेच वाढते उष्ण वातावरण यामुळे वीज पुरवठा सतत खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक, शेतकरी, व्यापारी व विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील संपूर्ण विद्युत पुरवठा यंत्रणा अंडरग्राउंड करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सध्या अनेक गावांमध्ये विजेच्या उघड्या तारांमुळे तांत्रिक बिघाड वारंवार निर्माण होतात. वादळ किंवा पावसाच्या काळात तारा तुटणे, पोल कोसळणे, शॉर्टसर्किट होणे यामुळे तासन्तास वीज पुरवठा खंडित राहतो. याचा परिणाम शेती पंप, पाणीपुरवठा, इंटरनेट सेवा, लघुउद्योग तसेच दैनंदिन जीवनावर होत आहे. अंडरग्राउंड वीज वाहिन्या केल्यास वादळ, पाऊस किंवा उष्णतेचा परिणाम कमी होऊन अखंडित व सुरक्षित वीज पुरवठा शक्य होईल. तसेच विजेची चोरी रोखण्यास मदत होईल. वारंवार करावी लागणारी दुरुस्ती व मेंटेनन्सचा खर्चही कमी होईल.
नागरिकांच्या मते, शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही आधुनिक व सुरक्षित वीज व्यवस्था उभारण्याची गरज आहे. शासन व महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन टप्प्याटप्प्याने ग्रामीण भागातील वीज पुरवठा अंडरग्राउंड करण्याची योजना राबवावी, अशी मागणी होत आहे.



