ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सर्वसामान्यांपर्यंत शिबिराचा लाभ पोहोचेल, असे प्रभावी नियोजन करा – आ. किशोर जोरगेवार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबिरासाठी नियोजन बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. समाजातील प्रत्येक नागरिकाला वेळेत आरोग्य सेवा मिळणे अत्यंत आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहांतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या आरोग्य शिबिरांचा लाभ प्रत्येक सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचेल, यासाठी प्रशासनाने प्रभावी नियोजन करावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह’ अंतर्गत मुख्यमंत्री सहायता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा प्रशासन चंद्रपूर तसेच भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी भव्य मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी वन विभागाच्या विश्रामगृहात नियोजन बैठक पार पडली.

यावेळी मनपा आयुक्त नरेश अनुकुरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मिनिंद कांबळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बंडू रामटेके, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. नैना उत्तरवार, मुख्यमंत्री सहायता निधी विभाग तसेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री सविता दंढारे, दशरथसिंह ठाकूर, बलराम डोडाणी, तुषार सोम, अजय जयस्वाल, प्रकाश देवतळे, मनपा गटनेते शेखर शेट्टी, नगरसेविका सविता कांबळे, आशा देशमुख, सरला कुळसंगे, सतीश तायडे, चंद्रशेखर देशमुख आदी उपस्थित होते.

बैठकीत १९ जुलै २०२६ रोजी मुल रोडवरील भवानजीभाई चव्हाण हायस्कूल येथे आयोजित करण्यात येणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या शिबिरामध्ये जनरल मेडिसिन, जनरल सर्जरी, अस्थिरोग, बालरोग, हृदयरोग, स्त्रीरोग, कर्करोग, नाक-कान-घसा, नेत्ररोग, त्वचारोग, दंतरोग, मूत्रपिंड विकार, मानसिक आरोग्य, फिजिओथेरपी आदी विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच आवश्यकतेनुसार विविध मोफत वैद्यकीय तपासण्या, मुख्यमंत्री सहायता निधी व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेबाबत मार्गदर्शन तसेच उपचारासाठी आवश्यक सहकार्यही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देत शिबिराचा लाभ चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याचे निर्देश दिले. हा सेवा सप्ताह समाजहिताला समर्पित असून गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी या मोफत महाआरोग्य शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये