स्वपक्षाच्या ग्रामपंचायतीविरोधात माजी सभापतींची तक्रार
काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहाला उधाण?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :- तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे माजी पंचायत समिती सभापती शाम रणदिवे यांनी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या येरगव्हाण ग्रामपंचायतीच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी गट विकास अधिकारी, पंचायत समिती कोरपना यांच्याकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे केल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात तसेच काँग्रेस पक्षात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रणदिवे यांनी आपल्या तक्रारीत ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामसभा कोष समितीच्या सदस्यांच्या कामकाजाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या तक्रारीमुळे येरगव्हाण ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही तक्रार काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि मान-अपमानाच्या राजकारणातून उद्भवली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
तक्रारीनंतर येरगव्हाण ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसभा कोष समितीचे सदस्य तसेच काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी या घडामोडींची गंभीर दखल घेतल्याचे समजते. या संदर्भात त्यांनी काँग्रेसचे कोरपना तालुका अध्यक्ष, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची भेट घेऊन तक्रारीसंदर्भात चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.
येरगव्हाण येथील काही पदाधिकाऱ्यांनी शाम रणदिवे यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याचेही सांगितले जात आहे. तसेच संबंधित तक्रार मागे घेण्यात आली नाही, तर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पुढील राजकीय भूमिका निश्चित करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे कोरपना तालुक्यातील काँग्रेस पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले असून, आगामी काळात हे प्रकरण नेमके कोणते वळण घेते, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.



