ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कमी पावसामुळे भात रोपवाटिकेचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात

डॉ. जी. आर. शामबुवर यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अपुऱ्या पावसामुळे भात रोपवाटिकांवर पाण्याचा ताण निर्माण होत असून, रोपांचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. अशा परिस्थितीत भात रोपवाटिकेचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने योग्य उपाययोजना कराव्यात, असे आवाहन वरिष्ठ तज्ञ डॉ. जी. आर. शामबुवर (वि.कृ.स.के., सिंदेवाही, जि. चंद्रपूर) यांनी केले आहे.

कमी पावसाच्या परिस्थितीत दुपारी १२ ते ४ या वेळेत रोपवाटिकेवर सुती कापड किंवा हिरव्या नेटची सावली देणे उपयुक्त ठरते. शक्य असल्यास रोपवाटिकेच्या ८ ते १० फूट उंचीवर ग्रीन नेट उभारल्यास पाण्याचा ताण सुमारे ५० टक्क्यांपर्यंत कमी होण्यास मदत होते.

रोपवाटिकेतील मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढविण्यासाठी बायोचार, गांडूळ खत किंवा लाकडाचा भुसा यांचा वापर करावा. तसेच पाणी केवळ संध्याकाळच्या वेळी हलक्या प्रमाणात द्यावे. पाण्याची उपलब्धता अत्यल्प असल्यास झारी किंवा पाठीवरील पंपाद्वारे फवारणी करावी. दुपारच्या कडक उन्हात पाणी देणे टाळावे. ज्या शेतकऱ्यांकडे मर्यादित ओलीताची सुविधा आहे, त्यांनी रोपवाटिकेत पाणी साचवून ठेवू नये. मातीमध्ये आवश्यक तेवढाच ओलावा (वाफसा) राहील इतकेच पाणी द्यावे.

रोपांना पाण्याच्या ताणाचा सामना करण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५) द्रावणाची तसेच ०.२ टक्के प्रोलीनची सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करावी. यामुळे रोपांची ताण सहन करण्याची क्षमता वाढून त्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

याशिवाय, २० ते ३० दिवसांच्या रोपांवर बाष्परोधकांची (Antitranspirant) फवारणी केल्यास पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन रोपे सुरक्षित राहतात. फवारणीपूर्वी एक तास अगोदर साध्या पाण्याची फवारणी करावी. बाष्परोधकांमध्ये पाण्यात विरघळणारे सिलिकॉन, केओलिन किंवा पोटॅशियम क्लोराइड यांचा शिफारशीनुसार वापर करता येतो. यामुळे पानांवर संरक्षणात्मक थर तयार होऊन पाण्याचे बाष्पोत्सर्जन कमी होते आणि रोपांना उष्णतेचा ताण सहन करण्यास मदत मिळते.

डॉ. जी. आर. शामबुवर यांनी शेतकऱ्यांनी कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या उपाययोजना राबवून भात रोपवाटिकेचे नुकसान टाळावे, असे आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये