बाबासाहेबांचा अवमान करणाऱ्या प्रवृतीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गणराज्य दिनाच्या राष्ट्रीय आणि सार्वजनिक कार्यक्रमात संविधानकर्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेता आणि फोटो वगळून करीत असलेल्या अवमानावर आळा घालण्यासाठी आणि कठोर कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले.
२६ जानेवारी २०२६ ला कोरपना तालुक्यातील मौजा गाडेगाव ( विरूर ) येथील ग्रामपंचायत कार्यालय येथील ग्रामपंचायत सरपंच, सचिव आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापिका लोखंडे मॅडम यांनी झंडावंदनाच्या कार्यक्रमात गणराज्य दिनाचे मानकरी आणि संविधानकर्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो न ठेवल्यामुळे येथील ग्रामस्थ सौ. करमनकरताई यांनी ही बाब लक्षात आणून देऊनही संबंधितांनी आम्ही कधीच फोटो ठेवत नाही, बाबासाहेबांचा फोटो ठेवण्याची काही आवश्यकता नाही असे बेजबाबदार, उर्मठ आणि अरेरावीची उत्तरे देऊन राष्ट्रीय नेत्यांचा अपमान करण्याच्या कुकृत्यात सामील असल्याचे दिसून आले.
असाच प्रकार लालबहादूर शास्त्री विद्यालय गडचांदूर येथे झाला असून त्याबद्दल पोलिस स्टेशन गडचांदूर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील मंत्री आणि नासिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा संविधानकर्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव न घेता केलेला बाबासाहेबांचा अपमान बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांच्या वर्मी लागला आहे.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अवमानित करण्याचा प्रकार आपल्या राज्यात काही अपवाद वगळता ग्रामपंचायत, जि. प. शाळा, खाजगी संस्था, कॉन्व्हेंट, निमशासकीय संस्था, कार्यालयात सर्रासपणे २६ जानेवारी गणराज्य दिनाचे कार्यक्रम सुरू असतात.
जातीयवादी मानसिकतेच्या लोकांत आणि लोकप्रतिनिधींच्या मनात बाबासाहेबांबद्दलचा द्वेष आणि असंवेदनशीलतामुळे संविधानकर्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा होणाऱ्या अवमानावर आळा घालण्यात यावा आणि महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत होत असलेल्या आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य चिटणीस अशोककुमार उमरे, रिपब्लिकन पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रभाकर खाडे, शिक्षण बचाव समन्वय समितीचे हरिदास गौरकार, रिपब्लिकन पक्षाचे तालुका सरचिटणीस गौतम धोटे, संपादक दिनेश झाडे पिपरी, रविदास करमनकर गाडेगाव विरूर, वनिता चतुरदास चंद्रागडे गाडेगाव विरूर, मनोज महेंद्र हस्तक, मेघराज हरबडे पत्रकार, दिगंबर धोटे, सांगोळा, शेषराज शिलारकर हिरापूर, संजय डोमाजी पाटील अंतरगाव, सुनील खारकर, संजोग चरणदास धोटे, धनराज जिवने सावलहिरा इत्यादींनी तारीख ०२ फेब्रुवारी २०२६ ला तहसीलदार कोरपना यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनाद्वारे केलीआहे.



