जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बडतर्फ कर्मचाऱ्याने घेतले विष – नागपुरात देतोय मृत्यूशी झुंज
'सुसाईड नोट' मध्ये पदाधिकारी, संचालक व अधिकाऱ्यांची नावे?

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील मृत खातेधारकांच्या बँक खात्यात जमा असलेली रक्कम परस्पर काढून आर्थिक गैरव्यवहार करण्यात करण्यात आल्याची गंभीर बाब 2021 मधे उघडकीस आली होती. यासंदर्भात बँकेने चौकशी समिती नेमून आर्थिक गैरव्यवहार करणाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. ह्या समितीने बँकेला आपला अहवाल सादर केल्यानंतर बँकेने मेंडकी शाखेतील अमित राऊत, अमित नागापुरे, संजय शेंडे, यशराज मसराम तथा भोयर ह्या पाच कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले.
दरम्यान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी बडतर्फची कारवाई झालेल्या अमित राऊत (४५) याने फाशी लावून आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र तो फसल्याने त्याने विषप्राशन केल्याचे उघड झाले असुन त्याने पत्नीच्या नावाने लिहिलेल्या पत्रात पदाधिकारी, संचालक व अधिकाऱ्यांची नावे लिहून ठेवल्याचे उघडकीस आल्याने बँकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दोन वर्षांपासून हे आर्थिक प्रकरण सुरू असतानाच मंगळवार ५ डिसेंबर रोजी बँकेचे बडतर्फे कर्मचारी अमित राऊत याने सुरुवातीला घरी गळफास लावून घेतला. मात्र पतीने गळफास लावल्याचे पत्नीच्या निदर्शनास येताच त्याचा जीव वाचविण्यात यश आले. परंतु त्यानंतर अमितने घराच्या बाहेर विष प्राशन केले. यात अमितची प्रकृती गंभीर झाली. त्याला चिंताजनक स्थितीत नागपूरच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. तिथे तो मृत्यूशी झुंज देत आहे.
दरम्यान, या प्रकरणात चौकशी योग्य पद्धतीने झाली नाही असे म्हणत अमितने आत्महत्या करण्यापूर्वी पत्नीकडे एक चिठ्ठी लिहून ठेवली. या चिठ्ठीत बँकेच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी राऊत यांच्या पत्नीने ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.