ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशाला महात्मा फुले यांच्या विचारांची आज अधिक गरज_राजुरेड्डी 

काँग्रेस कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट

घुग्घुस (चंद्रपुर) – स्त्री शिक्षणाचे प्रणेते, थोर समाजसुधारक आणि विचारवंत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यालयात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. शहर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी राजुरेड्डी म्हणाले की, “देशाला सध्या सामाजिक समतेच्या विचारांची नितांत आवश्यकता आहे. महात्मा फुले यांनी सामाजिक विषमतेविरुद्ध जे कार्य केले, त्यातून आजच्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज आहे.”

महात्मा फुले व त्यांच्या धर्मपत्नी सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली पुण्यातील भिडे वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडवली. त्या काळात झालेल्या तीव्र विरोधास सामोरे जात असताना, उस्मान शेख व त्यांची पत्नी फातिमा शेख यांनी फुले दांपत्यास खंबीर साथ दिली होती.

फुले यांनी शोषित, वंचित व अन्य समाजाला न्याय मिळावा, या उद्देशाने ‘सत्यशोधक समाज’ या संघटनेची स्थापना केली. जातीपाती, धर्म, अंधश्रद्धा, असमानता याविरोधात त्यांनी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत 1888 साली विठ्ठलराव वंडेकर यांनी त्यांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली.

त्यांच्या लेखणीतून “शेतकऱ्याचा आसूड” सारख्या क्रांतिकारी ग्रंथांनी समाजमन जागवले. आजच्या काळात त्यांच्या विचारांचा जागर होणे आवश्यक असल्याचे राजुरेड्डी यांनी ठामपणे सांगितले.

या कार्यक्रमाला महिला शहर कार्याध्यक्ष दीप्ती सोनटक्के, काँग्रेस नेते सय्यद अन्वर, जिल्हा महासचिव अलीम शेख, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष रोशन दंतलवार यांच्यासह रोहित डाकूर, सुनील पाटील, दीपक पेंदोर, कपिल गोगला, शहंशाह शेख, रंजीत राखुंडे आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे विचार समाजात पोहोचवण्याची प्रतिज्ञा घेतली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये