ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केपीसीएलच्या विरोधात महिलांचा एल्गार – साखळी उपोषणाचा ७ वा दिवस

२५ डिसेंबर नंतर आमरण उपोषण - पोलीस संरक्षणाविना महिलांचे सुरू आहे आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेडच्या विरोधात बरांज मोकासा येथील महिलांनी विविध मागण्यांसाठी साखळी उपोषण सुरू केले आहे.७ दिवस लोटून सुद्धा त्यांच्या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे २५ डिसेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा महिलांनी उपोषणस्थळी घेतलेल्या पत्र परिषदेत दिला. शेवटी मागण्या मान्य न झाल्यास सामूहिक आत्महत्या करू असेही त्यांनी यावेळी सांगितले.

बरांज मोकासा या गावातील दीडशे च्या वर महिला पुनर्वसन प्रकल्पग्रस्त महिला संघटना बरांज मोकासा या नावाने आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. उपोषण हे खान परिसरातील निर्जनस्थळी सुरू आहे. पोलीस संरक्षणाची मागणी करून सुद्धा ती दिली गेली नसल्याचे महिलांनी यावेळी सांगितले. उपोषणकर्त्या महिलांसोबत काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी सांगितले. या महिला मजुरी सोडून आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवकांच्या उपस्थितीत खालील ठराव घेण्यात आले. त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार २०१४ मध्ये ही खाण बंद झाली. नंतर ती सन २०२० ला सुरू झाली.

परंतु खाण बंद असताना १५ सप्टेंबर २०१६ ला करारपत्र झाले. त्यात प्रकल्पग्रस्तांना अत्यल्प मोबदला देण्याची तरतूद केली आहे. सदर करार मान्य नसल्याचे या सभेने ठरविले. तो करार रद्द करून नवीन करार करा असे सभेत ठरविण्यात आले. तसेच गावाचे पुनर्वसन प्रकल्पग्रस्त गावापासून आठ किलोमीटर अंतरावर नागपूर – चंद्रपूर मार्गावर करणे, पुनर्वसन करताना ज्यांना प्लॉट नको त्यांना १५ लाख रुपये देण्यात यावे, नोकरी ऐवजी १५ लाख रुपये अनुदान द्यावे, नोकरी करू इच्छिणाऱ्या प्रकल्पग्रसस्तांना कर्नाटका पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनीत कायमस्वरूपी नोकरी, वेकोलीच्या वेतनानुसार वेतन, कार्यरत कामगाराचा खाणीत मृत्यू झाल्यास ३० लाख आणि बाहेर झाल्यास २० लाख रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, गावातील १२६९ घरांचे भूसंपादन, प्रकल्पग्रस्त आदिवासींना पाच एकर शेती, सन २०१४ मध्ये ज्यांनी घरे पाडली त्यांना अजूनपावेतो मोबदला देण्यात आला नाही, कोळसा काढण्याकरिता अवेळी करण्यात येणाऱ्या ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना तसेच शाळेच्या इमारतीला तडे गेले आहेत. ते केव्हाही कोसळून दुर्घटना घडल्यास कंपनी आणि प्रशासन जबाबदार राहणार असेही यावेळी सांगितले.

गेल्या अनेक वर्षापासून निवेदने देऊन आणि आंदोलने करून आश्वासना व्यतिरिक्त काहीच मिळाले नसल्याने अखेर हा पवित्र घ्यावा लागत असल्याचे उपोषणास बसणाऱ्या महिला शोभा बहादे, पंचशीला कांबळे, पल्लवी कोरडे, ज्योती पाटील, मीरा देहारकर, माधुरी निखाडे, माधुरी वाढई यांनी सांगितले. यावेळी यांचेसह इतर दीडशे महिला उपस्थित होत्या. या आंदोलनास भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव राजू गैनवार यांनी लिखित पाठिंबा दिला.

उपोषणास तहसीलदार,केपीसीएलच्या अधिकारी वर्गांनी भेट दिली.आपल्या मागण्या रास्त असून त्या लवकरच सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले,परंतु महिलांचे समाधान न झाल्याने उपोषण सुरूच ठेवले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये