ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्ह्यातील प्रश्नांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली महसूल प्रधान सचिवांची भेट

महसूल विषयक मुद्यांवर विकास खारगे यांच्यासोबत सविस्तर चर्चा

चांदा ब्लास्ट

कोठारी येथे अतिरिक्त तहसिलदार कार्यालयाच्या पदभरतीची मागणी

५२ तलाठी कार्यालयांची कामे पूर्ण करण्यासह महसूल विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गती देण्यासाठी चंद्रपूर दौऱ्याची विनंती

चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव श्री. विकास खारगे यांची मुंबई येथे भेट घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील प्रलंबित महसूल विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय रेल्वे मंत्री ना. श्री. अश्विनी वैष्णव यांना भेटून चंद्रपूर जिल्ह्यातील विविध मुद्यांसंदर्भात आ. मुनगंटीवार यांनी निवेदन दिले. त्यानंतर आता महसूल प्रश्नांसंदर्भात प्रधान सचिवांची त्यांनी भेट घेतली. यावरून जिल्ह्यातील सर्व क्षेत्रांतील प्रश्न निकाली लावण्यासाठी आ. मुनगंटीवार सातत्याने प्रयत्नशील असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

श्री. विकास खारगे यांच्यासोबत झालेल्या भेटीत आ. मुनगंटीवार यांनी कोठारी येथे मंजूर झालेल्या अतिरिक्त तहसिलदार कार्यालयाच्या पदभरतीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली. जिल्ह्यातील महसूल प्रशासन अधिक सक्षम व कार्यक्षम करण्याच्या दृष्टीने ही पदभरती अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच जिल्ह्यातील ५२ तलाठी कार्यालयांमध्ये सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावीत, अशी सूचनाही त्यांनी केली. नागरिकांच्या दैनंदिन कामासंदर्भात निगडित असलेली ही कार्यालये प्रभावीपणे कार्यरत राहण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, तांत्रिक साधनसामग्री आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकडे आ. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.

महसूल विभागाच्या विविध प्रलंबित विषयांबाबत सखोल आढावा घेण्यासाठी श्री. विकास खारगे यांनी स्वतः चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करावा, अशी विनंतीही आ. मुनगंटीवार यांनी या भेटीत केली. या दौऱ्यात स्थानिक अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा होईल व जिल्ह्यातील महसूल विषयक प्रश्नांना गती मिळेल, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. या भेटीदरम्यान महसूल विभागाच्या संबंधित विविध विषयांवरही चर्चा झाली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये