हिंदू संघटन आणि व्यक्ती निर्माण हे संघाचे ध्येय _ गजानन वायचाळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
समरसतेतूनच चांगले समाज परिवर्तन घडते कुटुंब प्रबोधन,पर्यावरण संतुलन, सामाजिक समरसता,स्व आधारित व्यवस्था निर्मिती आणि नागरिक शिष्टाचार व कर्तव्याचे पालन यातून आपण सर्वांनी पंचपरिवर्तनयुक्त भारताची उभारणी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य हिंदुत्व अध्ययन केंद्राचे संयोजक व भारतीय विचार मंच विदर्भ प्रांत टोळी सदस्य श्री गजानन वायचाळ यांनी केले. नगर संघ शाखेच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते.
देऊळगाव राजा नगरातील अस्मिता लॉन्स प्रांगणात दिनांक 7 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी संपन्न झालेल्या विजयादशमी उत्सवाच्या कार्यक्रमात मंचावर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत राजे विजयसिंह जी जाधव वंश पारंपारिक विश्वस्त श्री बालाजी संस्थान तथा अध्यक्ष व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देऊळगाव राजा हे होते .तसेच मंचावर तालुका संघचालक संजय गायकवाड व नगर संघचालक पुरुषोत्तम धन्नावत हे विराजमान होते. प्रारंभी अतिथींच्या हस्ते गो माता पूजन व शस्त्रपूजन झाले. स्वयंसेवकांनी विविध प्रात्यक्षिके सादर केली प्रास्ताविक, परिचय व आभार प्रदर्शन नगर संघचालक पुरुषोत्तम धन्नावत यांनी केले.
पुढे बोलताना वायचाळ म्हणाले हिंदू राष्ट्र उभारणीच्या कार्यात संघाचे मोठे योगदान आहे संघाच्या माध्यमातून देशभरात लाखो सेवा प्रकल्प सुरू असून कोट्यावधी जनतेशी संपर्क व सेवा केली जाते. भूकंप पूर यासारख्या नैसर्गिक आपत्ती व राष्ट्रीय संकट काळी संघ स्वयंसेवक जातपात न बघता तत्परतेने सेवेसाठी धावून जातात .या सेवेची अनुभूती कोरोना काळात अनेकांनी अनुभवली असेलच.
प्रमुख अतिथी श्रीमंत राजे विजयसिंह जाधव म्हणाले मी संघ स्वयंसेवकांचे शिस्तबद्ध पद्धतीने उत्सवातील विविध कार्यक्रम पाहून प्रभावित झालो आहे .सेेवा कार्यात संघ अग्रेसर आहे.
संघ ही काळाची गरज असल्यामुळे मुलांवर चांगले संस्कार होण्याकरिता शिस्त लागण्याकरिता पालकांनी आपल्या मुलांना संघाच्या दैनंदिन शाखेत पाठवणे राष्ट्र कार्यात हातभार लावण्यासारखेच आहे. याप्रसंगी शहरातील बहुसंख्य नागरिक यांची उपस्थिती होती. उत्सवापूर्वी स्वयंसेवकांनी नगरातून घोषासह शानदार पथसंचलन केले.माता,भगिनी व पूर्ण देऊळगाव राजा वासीयांनी पथसंंचलनाचे स्वयंस्फूर्तीने उत्स्फूर्त असे स्वागत केले.