धान उत्पादक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार
आ. मुनगंटीवार यांनी गोसिखुर्द मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

चांदा ब्लास्ट
मुल, चिमूर, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, गोंडपिंपरी आणि इतर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय
गोसिखुर्द प्रकल्पातील तलावातून पाणी सोडण्याची मागणी; धान पिकासाठी त्वरित सिंचन व्यवस्था करण्याचा आग्रह
चंद्रपूर : जिल्ह्यातील धान पिकाचा प्रमुख पट्टा असलेल्या मुल, चिमूर, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, गोंडपिंपरी आणि इतर तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी कार्यवाही सुरू झाली आहे. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी पाठपुरावा करत गोसिखुर्द प्रकल्पातील आरक्षित तलावातून तातडीने पाणी सोडण्याची मागणी गोसिखुर्द प्रकल्प मंडळाच्या अधिक्षक अभियंत्यांना केली आहे.
धान पिकासाठी जीवनदायी ठरणारे हे पाणी वेळेवर उपलब्ध होणे गरजेचे आहे. यावर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. याच पार्श्वभूमीवर आ. सुधीर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी गोसीखुर्द प्रकल्पातील पाणी आसोलामेंढा तलावामध्ये सोडून शेतकऱ्यांना नहराद्वारे पाणी पुरविण्यासाठी मागणी करत कार्यकारी अभियंत्यांना त्वरित कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देणारे आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या या पुढाकारामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केलेल्या मागणीसाठी शेतकरी बांधवांकडून आ. सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले जात आहे.