स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन : NAMASTE योजनेबाबत मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिका स्वच्छता व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात 41 स्वच्छता कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.
शिबिरामध्ये केंद्र शासनाच्या NAMASTE (National Action for Mechanized Sanitation Ecosystem) योजनेबाबत कर्मचाऱ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. ही योजना केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय तसेच केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या संयुक्त सहकार्याने राबवली जात आहे.
NAMASTE योजनेचा उद्देश सांडपाणी व सेप्टिक टाक्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षितता, प्रतिष्ठा आणि सामाजिक-आर्थिक उन्नती सुनिश्चित करणे आहे. या योजनेत प्रशिक्षण, सुरक्षा उपकरणे (PPE किट्स), आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य विमा, यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून सुरक्षित स्वच्छता कार्य, तसेच स्वयं-सहायता गट स्थापनेस प्रोत्साहन दिले जाते.
शिबिर प्रसंगी स्वच्छता विभागप्रमुख डॉ. अमोल शेळके, मुख्य स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, महेंद्र हजारे, शुभम खोटे, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक, व अन्य कर्मचारी उपस्थित होते.
“स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता आणि सन्मान हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. NAMASTE सारख्या योजनांमुळे केवळ त्यांच्या कामाचे यांत्रिकीकरण होत नाही, तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्गही खुला होतो.”
— डॉ. अमोल शेळके, स्वच्छता विभागप्रमुख, चंद्रपूर महानगरपालिका