नागपूरच्याच महसूलमंत्र्यांच्या नागपूर विभागात पदोन्नतीला विलंब का? खासदार प्रतिभाताई धानोरकरांचा संतप्त सवाल !
कोकणच्या तुलनेत दिरंगाईमुळे खासदार प्रतिभाताई धानोरकर संतप्त; नायब तहसीलदार पदोन्नती त्वरित पूर्ण करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : नागपूरचे असलेले महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच विभागात नायब तहसीलदार पदांच्या पदोन्नतीला दिरंगाई का होत आहे, असा थेट आणि संतप्त सवाल उपस्थित करत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महसूलमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. कोकण विभागातील पदोन्नत्या पूर्ण झाल्या असताना, नागपूर विभागातील अव्वल कारकून आणि मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नतीची प्रक्रिया रखडल्याने खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
नागपूर महसूल विभागात अंदाजे ४५ नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक ठिकाणी एका नायब तहसीलदाराकडे दोन ते तीन सर्कलचा अतिरिक्त कार्यभार आहे. परिणामी, जनतेची कामे वेळेवर मार्गी लागत नाहीत आणि शासनाच्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे होण्यास विलंब होत आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, विभागीय आयुक्त, नागपूर विभाग, नागपूर यांनी अव्वल कारकून, मंडळ अधिकारी यांच्या निवडसूची २०२४-२५ नुसार विभागीय पदोन्नती समितीद्वारे मंजूर केलेली निवडसूची मार्च २०२५ मध्येच शासनाकडे सादर केली आहे. असे असूनही, गेल्या दोन महिन्यांपासून ही फाईल मंत्रालयीन स्तरावर प्रलंबित आहे, ही चिंतेची बाब आहे.
कोकण विभागातील अशाच प्रकारच्या पदोन्नत्या पूर्ण झाल्या असताना, नागपूर विभागाच्या पदोन्नती प्रक्रियेला विलंब का होत आहे, आणि विशेषतः महसूलमंत्री स्वतः नागपूरचे असताना हा अन्याय का, असा सवालही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी उपस्थित केला आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पत्रात सर्वोच्च न्यायालयाच्या अलीकडील निर्देशांचाही संदर्भ दिला, ज्यात स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश शासनाला दिले आहेत. नायब तहसीलदारांची पदे रिक्त असल्याने निवडणुकीच्या कामांवरही परिणाम होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
याव्यतिरिक्त, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १३ जानेवारी २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार १०० दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यात सर्व विभागांतील रिक्त पदे १०० दिवसांच्या कार्यक्रमानुसार भरण्याची ग्वाही दिली होती. या ग्वाहीकडे महसूल विभागाने लक्ष देऊन तातडीने पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, अशी मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी महसूलमंत्र्यांकडे केली आहे.
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आग्रह केला आहे की, या महत्त्वाच्या पदोन्नती प्रक्रियेला गती देऊन जनतेची कामे वेळेवर मार्गी लागावीत आणि प्रशासकीय यंत्रणा अधिक सक्षम व्हावी यासाठी महसूलमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावे.