ताज्या घडामोडी

बँक ऑफ इंडियाच्या सेवा केंद्रात लाखोंचा घोटाळा?

ग्राहकांचे पैसे खात्यात जमा न करता केला अपहार? - सेवा केंद्र मागील आठ दिवसांपासून बंद

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

बँक ऑफ इंडियाच्या राजुरा शाखेच्या सेवा केंद्रात ग्राहकांच्या रकमेचा अपहार झाल्याची चर्चा शहरात सुरू असुन ही रक्कम काही लाखांच्या घरात असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार शहरात मुख्य बाजारपेठेत असलेल्या नगर पालिकेच्या संजय गांधी मार्केट ह्या इमारतीत बँक ऑफ इंडियाचे सेवा केंद्र सुरू केले असुन ह्या केंद्रातून बँकेचे ग्राहक खाते उघडणे, रक्कम जमा करणे त्याचप्रमाणे रक्कम काढणे इत्यादी कामे केल्या जातात. ह्या बदल्यात बँकेतर्फे सेवा केंद्राला प्रत्येक कामासाठी विशिष्ठ मोबदला दिल्या जातो.

मात्र राजुरा येथिल बँक ऑफ इंडियाच्या सेवा केंद्रात लाखोंचा घोटाळा झाला असल्याची शहरात जोरदार चर्चा असुन सेवा केंद्र संचालकांनी कित्येक ग्राहकांकडून केंद्राच्या क्षमतेपेक्षा जास्त रक्कम खात्यात जमा करण्यास स्वीकारली. ग्राहकांना दोन किंवा तीन टप्प्यात रक्कम जमा करण्यात येईल असे सांगितले. ग्राहकांनी देखिल ह्यावर विश्वास ठेऊन मोठ्या रकमा सेवा केंद्र संचालकांच्या स्वाधिन केल्या. सुरवातीला ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रामाणिकपणे रक्कम खात्यात जमा करण्यात येत होती मात्र कालांतराने विश्वास संपादन झाल्यानंतर रक्कम जमा होण्यासाठी विलंब होणे सुरू झाले. कधी नेटवर्क फेल तर कधी इतर करणे देऊन वेळ मारून नेणे सुरू झाले मात्र ही रक्कम काही लाखांच्या घरात गेल्यानंतर आपल्याला ग्राहकांचे पैसे परत करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्याने मागील आठ ते दहा दिवसांपासून सेवा केंद्र बंद असल्याने ग्राहकांच्या मनातील चलबिचल वाढली आहे.

सध्यातरी घोटाळ्याची नेमकी रक्कम किती हे स्पष्ट झाले नसले तरी ग्राहकांनी आपले खाते पुस्तक शाखेतून भरून घेतल्यानंतर कुणाच्या किती रकमेचा घोळ झाला आहे ते स्पष्ट होईल.

यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बँकेने ह्यसंदर्भात कानावर हात ठेवले असुन बँकेला ह्याबाबत कुठल्याही ग्राहकाची लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही असे सांगितले मात्र सेवा केंद्र मागील आठ ते दहा दिवसांपासून बंद असण्याच्या बाबीला दुजोरा दिला असुन ग्राहकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यास बँक प्रकरणाची चौकशी करेल असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये