ताज्या घडामोडी

रिसीव्ह कॉपी’साठीही घेतली जाते लाच

तहसील कार्यालयातील आवक जावक विभागातील प्रकार

चांदा ब्लास्ट: शेखर गजभिये

(विशेष प्रतिनिधी)
नागपूर : अलिकडेच सावनेर तालुक्यात भूमी अभिलेख कार्यालयात एक कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. या घटनेची शाही मिटत नाही तोच सावनेरमधील तहसील कार्यालयातील लाचेचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. मात्र या कर्मचाऱ्याची अद्याप कोणीही तक्रार न केल्याने त्यावर कुठलीही कारवाई होत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सावनेर तहसील कार्यालयातील आवक-जावक विभागातील लिपिक येथे येणाऱ्या अभ्यागतांकडून तसेच तक्रारदारांकडून निवेदन स्वीकारल्यानंतर देण्यात येणाऱ्या रिसिव्ह कॉपी म्हणजेच पोच पावतीसाठी लाच घेत असल्याची संतापजनक बाब समोर आली आहे.
एका पीडित निवेदनकर्त्याने त्याच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात तहसीलदार मलिक विराणी यांना देण्यासाठी लेखी अर्ज आवक जावक विभागात सादर केला असता लाचेचा प्रकार उघडकीस आला.
सावनेर तहसील कार्यालयात संपूर्ण तहसीलमधील गाव खेड्यांमधून विविध समस्या घेऊन येणाऱ्या अभ्यागतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सावनेर तहसील कार्यालयातील आवक जावक विभागातील लिपिक नागरिकांद्वारे तहसीलदारांना देण्यात येणाऱ्या तक्रारी किंवा निवेदन स्वीकारतो. मात्र अनेकदा या नागरिकांना सदर लिपिक रिसिव्ह कॉपी देण्यास नकार देतो. जर रिसिव्ह पाहिजे असेल तर खिसा हलका करावा लागेल असेही तो बोलतो. अन्यथा पत्र द्या आणि निघून जा तुमचे निवेदन तहसीलदार साहेबांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला याची माहिती मिळेल. असे तो या नागरिकांना सांगतो. मात्र तक्रारीची प्रत स्वीकारल्यानंतर ते निवेदन तहसीलदारांपर्यंत पोहोचत नाही आणि त्यावर कुठलीही कारवाई होत नाही. अनेकांचा हिरमोड होतो आणि समस्याग्रस्त नागरिकांचा संपूर्ण राग हा तहसीलदारांवर निघतो. कारण समस्या सोडवणे किंवा तक्रारींवर योग्य ती कारवाई करणे तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे काम तहसीलदार करत असतात. मात्र लिपीकांच्या लाचखोरीपणामुळे तहसीलदारांपर्यंत शेतकऱ्यांच्या समस्या पोहोचतच नाहीत.
सावनेर तहसील कार्यालयात दररोज हजारो नागरिक शेतकरी आपल्या विविध समस्या घेऊन येतात. परंतु त्यांचं निवेदन संबंधित अधिकारी किंवा तहसीलदारांपर्यंत पोहोचत नसल्याने या तहसील कार्यालयात योग्य न्याय मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे. यावर तहसीलदार मलिक विराणी काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
——
बॉक्स…
“तहसीलदार साहेब अनभिज्ञ”
अशाच प्रकारच्या अनेक भानगडी व गैरव्यवहार सावनेर तहसील कार्यालयात सुरू आहेत मात्र त्यापासून तहसीलदार मलिक विराणी अनभिज्ञ आहेत. यापुढे ती प्रकरणे वाचकापर्यंत लवकरच पोहोचतील.
—————–

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये