ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शालेय स्मृतींना उजाळा देणारे स्नेहमिलन संपन्न

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार : स्व. मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा इथे पार पडलास स्नेह मिलन सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

भद्रावती तालुक्यातील स्वर्गीय मातोश्री यमुनाबाई शिंदे विद्यालय चोरा येथील इयत्ता १०, वी पर्यंत शिक्षण घेऊन २०१५-१६ साली शालांत परीक्षा देऊन पुढील शिक्षणासाठी विलग झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने दिनांक १४ मार्च २०२६ रोजी स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

अनेक वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. पुढील शिक्षणानंतर नंतर नौकरी, व्यवसायात गुंतलेले लग्ने होऊन सांसारिक जीवनात रमणाऱ्या तत्कालीन विद्यार्थ्यांच्या मनात जुने संवगडी, शालेय स्मृतीं शाळा परिसर, शिक्षक घर करून होते. जुन्या स्मृतींचा गंध कायम हृदयात असल्याने परत एकदा सर्वांनी एकत्र येऊन आपापसात संवाद साधावा असे सर्वांना वाटत होते. आणि मंगेश यादव इखारे यांनी संयोजनाची जबाबदारी स्वीकारून सर्वांना एकत्रित केले व हा स्नेहमिलनाचा योग जुळवून आणला. उत्कृष्ट नियोजन करून सुंदर व भावपूर्ण असा सुरेख सोहळा संपन्न करण्यात ते यशस्वी झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य महादेव ताजणे होते. त्यांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात प्रगती करत असताना शाळा व गुरुजनांचे ऋण कायम लक्षात ठेवावे तसेच शाळेच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान द्यावे, असे आवाहन केले.

या प्रसंगी शाळेचे शिक्षकवृंद वाकडे येलकर , जवादे रामटेके ठावरी आदी गुरुजनासह माजी मुख्याध्यापक मांडवकर उपस्थित होते. याशिवाय भोमले भगत आणि भोस्कर यां गुरुवर्यानी सुद्धा उपस्थित राहून माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमादरम्यान तत्कालीन बॅचमधील विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यामध्ये इंडियन आर्मीमध्ये देशसेवा करणारे खुशाल बांदुरकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच विद्युत सहायक म्हणून कार्यरत अंकिता कातकर, उत्कृष्ट व्यवसायिक मयूर पिंपळकर, मुंबई मेट्रोमध्ये टेक्निशियन म्हणून कार्यरत दामिनी नन्नावरे तसेच युनियन बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत रूपल मेश्राम यांचा सुद्धा गौरव करण्यात आला.

या स्नेहमिलन सोहळ्याला निखिल थेरे व इतर वर्गमित्रांसह सुमारे पन्नास माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमित सपाट यांनी उत्कृष्ट पद्धतीने केले.कार्यक्रमामुळे माजी विद्यार्थ्यांना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला तसेच गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली.

एकूणच, माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने हा स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये