ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देणगीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या महिलांच्या टोळीवर वर्धा पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : देणगीच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या महिलांच्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात वर्धा पोलिसांना यश आले आहे. राजस्थान व गुजरात राज्यातील २१ महिला आणि त्यांच्यासोबत असलेल्या ७ अल्पवयीन बालकांना वर्धा शहरातील सिव्हिल लाईन्स, आर्वी चौक तसेच इतर भागातून ताब्यात घेण्यात आले.गुप्तचर शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, या महिला उच्चभ्रू व गर्दीच्या परिसरात उभे राहून धार्मिक पुस्तके विक्री व सामाजिक कार्याच्या नावाखाली नागरिकांकडून देणगी गोळा करत होत्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस अधीक्षक सौरव कुमार अग्रवाल वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलीस निरीक्षक संतोष टाले यांनी कारवाई केली.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तृप्ती चव्हाण यांच्या आदेशानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईनच्या सहकार्याने सर्व महिला व बालकांना ताब्यात घेऊन बालकल्याण समितीसमोर हजर करण्यात आले. समितीने आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्याचे निर्देश दिले.

पोलिस तपासात संबंधित महिला अहमदाबाद (गुजरात) येथून आल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे देणगीदारांची यादी व विविध कागदपत्रे आढळून आली. मात्र, कोणत्याही नोंदणीकृत संस्थेचे नाव अथवा नोंदणी क्रमांक सापडला नाही. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

सदर महिलांचा गट मोहन धर्मशाळेत वास्तव्यास असल्याचेही तपासात समोर आले. सर्व महिलांची पोलीस स्टेशनमध्ये सखोल चौकशी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अहमदाबाद यांच्याशी समन्वय साधून सर्वांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणाची माहिती एटीएसकडूनही तपासली जात असून नागरिकांनी अशा प्रकारच्या देणगी मागणाऱ्या टोळ्यांपासून सावध राहावे, कोणत्याही अनोळखी व्यक्तीस विनाकारण आर्थिक मदत देऊ नये, असे आवाहन वर्धा पोलिसांनी केले आहे. संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा महिला व बालविकास विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी

तृप्ती चव्हाण यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी महेश कामडी आणी चाईल्ड हेल्प लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांनी कार्य केले. सदर कार्यात यावेळी पोलीस स्टेशन वर्धा शहरचे पोलीस कर्मचारी श्री. गहुकर सीमा धोगडे महिला व बाल विकास विभागाचे वैशाली मिस्कीन माधुरी शंभरकर. शीतल घोडराव, जयश्री निवल सुरज वानखेडे, ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्ट वर्धा चे संतोष ढोणे वैभव भांडकर पोलीस उप निरीक्षक मिश्रा लोहमार्ग पोलीस भावे या संपूर्ण कार्यवाहीत सहभागी होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये