घुग्घुसमध्ये भाजप नेत्यांच्या नातलगांकडून शालेय बस चालकाला दमदाटी
पोलिसांनी दाखल केली एनसीआर

चांदा ब्लास्ट
सर्वसामान्य नागरिकांवर राजकीय प्रभाव दाखविण्याचे प्रकार वाढत चालले असून, आता त्याची झळ शालेय बसचालकांनाही बसू लागली आहे. माउंट स्कूल बस चालक अमोल मांढरे यांना भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या नातलगांकडून भरचौकात शिवीगाळ करून दमदाटी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
घटनेनंतर अमोल मांढरे यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी संबंधित कार्यकर्त्याविरोधात आवश्यक कलमांअंतर्गत एनसीआर दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
अमोल मांढरे हे WCL प्रायव्हेट शाळेच्या बसचे चालक असून, ४ ऑक्टोबर रोजी ते नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जात असताना, भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य व त्यांचे नातेवाईक यांनी बसमध्ये जागा नसल्याचे कारण काढून बस अडवली. त्यानंतर बसचालकाला गलिच्छ भाषेत शिवीगाळ, कॉलर पकडून धमकावणे आणि “तुला कामावरून काढून टाकतो” अशा धमक्या दिल्या.
हा प्रकार विद्यार्थ्यांसमोर घडल्याने शालेय मुलांमध्ये व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर अमोल मांढरे यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, अलीकडेच २०० युनिट मोफत वीज या मागणीवर आमरण उपोषण झाल्यानंतर राजकीय रागातूनच हा प्रकार घडवून आणण्यात आला असावा.
स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध करत “राजकारणाचा दबाव दाखवून सामान्य माणसाला त्रास देणे हा लोकशाहीचा अपमान आहे” असे म्हटले आहे. त्यांनी पोलिसांकडे दोषींवर कठोर कारवाई करून बसचालक व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची हमी देण्याची मागणी केली आहे.
घुग्घुस परिसरात या घटनेमुळे संतापाचे वातावरण असून, शालेय बसचालक संघटनांनीही पुढील काळात एकत्र येऊन आंदोलनाची चेतावणी दिली आहे.