चांदाब्लास्ट विशेष

तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा तंटा – नियमबाह्य पद्धतीने केली ग्रामसभा

प्रशासकाची भुमिका संशयास्पद - राजकीय दबावात अध्यक्ष पदाची निवडणुक टाळल्याचा ग्रामस्थांचा आरोप

राजुरा तालुक्यात विविध ग्रामपंचायत क्षेत्रात तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची निवड सुरू असुन बर्‍याच ठिकाणी अविरोध तर काही ठिकाणी निवडणूकीच्या माध्यमातुन निवड केल्या जात आहे. मात्र सोंडो ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रशासकाच्या भूमिकेमुळे तंटा निर्माण झाल्याची ओरड ग्रामस्थांनी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की, काल दिनांक 16 सप्टेंबर 2021 रोजी सोंडो ग्रामपंचायत क्षेत्रात तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाची साठी तसेच इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती.

गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार इतर विषयांवर खेळीमेळीच्या वातावरणात निर्णय घेण्यात आले. मात्र तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदाकरीता दोन उमेदवार समोर आले. त्यामुळे प्रशासकांनी आधी कोणत्या बाजुने जास्त समर्थन आहे त्याची पडताळणी करण्याचे सचिवांना सांगितले. सचिवांनी तशी पडताळणी करून बहुमत कोणत्या बाजुला आहे ह्याची माहिती प्रशासकांना दिली.

उपस्थितीवरून कोण विजयी होणार ह्याचा सर्वांना अंदाज आल्याने समर्थकांनी जल्लोष सुरू केला मात्र दरम्यान प्रशासकांनी गोंधळाचे कारण देऊन चक्क ग्रामसभा रद्द झाल्याचे घोषित करून ग्रामस्थांना आश्चर्याचा धक्का दिला.

वास्तविक पाहता ग्रामसभेत कोरम पुर्ण होता. कुठल्याही प्रकारची बाचाबाची अथवा संघर्षाची स्थिती निर्माण झाली नव्हती केवळ संभावित विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी जल्लोष सुरू केला त्यामुळे थोडा गोंधळ झाल्याचे चित्र निर्माण झाले. अशा स्थितीत प्रशासकांनी काही वेळासाठी ग्रामसभा तहकूब करून पुन्हा एकदा ग्रामसभा सुरू करणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे गोंधळाची स्थिती आहे असे वाटल्यास तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदासाठी गुप्त मतदान घेणे शक्य होते मात्र त्यांनी तसे न करता थेट ग्रामसभा रद्द झाल्याचे घोषित केले. 

वास्तविक पाहता नियमाप्रमाणे पेसा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायतीमधे आयोजित ग्रामसभा रद्द करता येत नाही असा नियम असतानाही प्रशासकांनी नियमबाह्य पद्धतीने सभा रद्द केली. ह्या संदर्भात ग्राम सचिवांनी प्रशासकांना नियमांची माहिती देऊनही त्यांनी मनमानीपणे निर्णय घेतला अशी ग्रामस्थांची तक्रार असुन राजकीय दबावात ग्रामसभा रद्द केल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला असुन नियमबाह्य पद्धतीने ग्रामसभा रद्द करून बहुमत असलेल्या व्यक्तीला तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष होण्यापासून रोखल्यामुळे कायद्याचा भंग झाला असुन सदर प्रशासकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button