चंद्रपूर येथून दहशतवाद्याला अटक – 20 वर्षीय खलिस्तानवादी अतिरेक्यांच्या आवळल्या मुसक्या
सहा दिवसांपासून होता महाराष्ट्रात - पंजाब पोलिसांच्या केले स्वाधिन

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी
आशिष रैच राजुरा
देशात सर्वत्र शांतता नांदत असताना व दहशतवादी (Terrorist) कारवाया नियंत्रणात असताना चंद्रपूर येथून खलिस्तानवादी (Khalistani) दहशतवाद्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या बातमीने खळबळ उडाली असुन 20 वर्षीय हा दहशतवादी जिल्ह्यातील एका कंपनीच्या परिसरात वास्तव्यास असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी संपूर्ण शहानिशा करून त्याला शिताफीने अटक केल्याने पोलीस विभागाचे कौतुक होत आहे.
सविस्तर वृत्त असे की, अमृतसर येथील पोलीस चौकीवर हँड ग्रेनेड (Hand Graned) फेकुन फरार होण्यात यशस्वी ठरलेल्या खलिस्तानवाद्याला चंद्रपूर येथून शिताफीनं पकडण्यात गुप्तचर यंत्रणेला यश आले. स्थानिक पोलीस आणि गुप्तचर यंत्रणेनं ही संयुक्त कारवाई केली. जसप्रीत सिंग (वय 20) नामक अतिरेक्याला शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास अत्यंत गुप्तपणे ही कारवाई करून त्या दहशतवाद्याला न्यायालयात सादर करून ट्रान्झिट रिमांड (Transit Remand) वर पंजाब पोलिसांच्या सुपुर्त करण्यात आल्याची माहिती, जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन (Mumakka Sudarshan) यांनी दिली.
लॉयड मेटल कंपनी परिसरातुन घेतले ताब्यात
2023 मध्ये अमृतसर येथील पोलीस चौकीवर बॉम्ब हल्ला झाला होता. ह्या हल्ल्याचा मास्टरमाईंड जसप्रीत सिंग असल्याचे पंजाब पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले होते मात्र तेव्हापासून जसप्रीत सिंह फरार होता. हा दहशतवादी चोरीच्या दुचाकीच्या मदतीने अतिरेकी कारवाया करण्यात पटाईत होता हे विशेष. त्याचप्रमाणे अमली पदार्थांच्या धंद्यातही त्याचा सक्रिय सहभाग असल्याची माहिती पंजाब पोलिसांनी दिली होती. पोलीस ठाण्यावर हात बॉम्ब फेकून जसप्रीत सिंह 2023 मधे फरार झाला होता. तेव्हापासून पंजाब पोलीस त्याच्या मागावर होते. यापूर्वी तो मेघालय राज्यात गेल्याची माहिती होती. त्याच्या मोबाईल फोनवरुन गुप्तचर यंत्रणा त्याचा ठावठिकाणा घेत होती. अशातच सहा दिवसांपूर्वी तो महाराष्ट्रात दाखल झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत केंद्रीय गुप्तचर यंत्रणेनं इशारा दिल्यानंतर महाराष्ट्र पोलीस गुप्तचर यंत्रणांच्या मदतीने त्याचा ठावठिकाणा शोधत असताना जसप्रीत सिंग हा चंद्रपूर जिल्ह्यातील आला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली.
घुग्गुस येथिल लॉयड मेटल या कंपनीत ओळखीच्या व्यक्तीसोबत तो वास्तव्यास असल्याची प्राथमिक माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर यंत्रणेच्या पथकानं त्याच्या मुसक्या आवळल्याचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन ह्यांनी सांगितले. जसप्रीत हा क्रेन चालक होता. लॉयड मेटल कंपनीने दुसऱ्या कंपनीला वाहतुकीचे कंत्राट दिलं आहे. त्याच कंपनीत तो पूर्वी कामाला होता. याच कंपनीतील सहकाऱ्यांच्या ओळखीनं जसप्रीत घुग्गुसला आला.
अशी पटली दहशतवाद्यांची ओळख
जसप्रीत सिंगचे फोटो आधीच जारी करण्यात आले. याच नावानं तो घुग्गुस इथं राहत होता. गुप्तचर यंत्रणा त्याच्यावर निगराणी ठेवून होते, मात्र हा तोच आरोपी आहे का याची शहानिशा होत नव्हती. गुरुवारी जसप्रीत हा इथल्या स्थानिक सुपर मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी आला. याच दिवशी हा तोच आतंकवादी असल्याची पुष्टी झाली आणि यानंतर त्याला अटक करण्यात आली.
नागपूर-चंद्रपूर गुप्तचर यंत्रणेची संयुक्त कारवाई
ओळख झाल्यावर केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या नागपूर आणि चंद्रपूर इथल्या सहा जणांच्या पथकानं त्याला शिताफीनं अटक करण्यात आली. चंद्रपूर पोलिसांना देखील याबाबत सूचित करण्यात आलं.
पंजाब पोलिसांच्या केले सुपूर्त
ही माहिती पंजाब पोलिसांना देण्यात आली. पंजाब पोलिसातील विषेश पथक त्वरित चंद्रपुरात दाखल झालं. दोन वाहनातून 8 अधिकारी इथं दाखल झाले. यानंतर स्थानिक प्रशासनाच्या समोर हजर केल्यावर पंजाब पोलीस त्याला अटक करुन घेऊन गेले.
पोलीस पडताळणी न करताच खाजगी कंपन्यांत होते नोकर भरती?
चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळं इथं काम करण्यासाठी परराज्यातून येणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. यात काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचाही समावेश असतो. बाहेरुन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची पोलीस पडताळणी होणं गरजेचं आहे. संबंधित कंपनीला याची माहिती पोलीस विभागाला देणं अनिवार्य असते. असं असताना अनेक कंपन्या या नियमाकडं विशेष दुर्लक्ष करतात, असं चित्र आहे. पोलीस विभाग देखील याबाबत कठोर पाऊल उचलत नाही. गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. ज्या ठिकाणी असे उद्योग आहेत, त्याच परिसरात गुन्हेगारीचं प्रमाण देखील वाढत चाललं आहे. ह्याकडे पोलीस प्रशासन तसेच खाजगी कंपनी व्यवस्थापनाने लक्ष देणे गरजेचे असुन जिल्ह्यातील गुन्हेगारी तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपाययोजना व नियमांचे पालन न करणाऱ्या कंपनी व्यवस्थापना विरोधात कठोर कारवाई होणे अत्यावश्यक झाले आहे.
#chandablast