ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विदर्भ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

ग्रंथप्रदर्शनातून विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा; डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांना उजाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- येथील विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाविद्यालयाच्या ग्रंथालयात भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात विविध विषयांवरील पुस्तके विद्यार्थ्यांच्या वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन एस. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला दल्लूजी पाटील उसेंडी महाविद्यालय, जिवती येथील प्राचार्या डॉ. एस. एच. शाक्य प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे ग्रंथपाल महेंद्र एस. साबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

वाचनामुळे व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते : डॉ. गजानन एस. राऊत

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गजानन एस. राऊत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. नियमित वाचनामुळे ज्ञानात भर पडते, विचारशक्ती विकसित होते आणि व्यक्तिमत्त्वाला सकारात्मक दिशा मिळते. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातील पुस्तकांसोबतच अवांतर वाचनाचीही सवय जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रमुख पाहुण्या डॉ. एस. एच. शाक्य यांनी आपल्या मनोगतात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यामागील उद्देश स्पष्ट केला. डॉ. कलाम यांचे प्रेरणादायी जीवन, ज्ञानाविषयीची जिज्ञासा आणि पुस्तकांवरील प्रेम विद्यार्थ्यांसाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी डॉ. कलाम यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन नियमित वाचनाची सवय लावावी आणि ज्ञानाच्या बळावर आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे ग्रंथपाल महेंद्र एस. साबळे यांनी विद्यार्थ्यांना वाचन प्रेरणा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच ग्रंथालयात आयोजित ग्रंथप्रदर्शनाला भेट देऊन विविध विषयांवरील पुस्तकांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यास आणि ग्रंथालयाच्या वापराला प्रोत्साहन मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होता. डॉ. अमित बोरकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाची सांगता करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये