तलवारीचा धाक दाखविणाऱ्याला लोखंडी तलवारीसह अटक
भद्रावती पोलिसांची कारवाई : ५२.५ सेंमी लांबीची तलवार जप्त; एकावर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील भंगाराम वॉर्ड परिसरात विनापरवाना तलवार बाळगणाऱ्या मुन्ना मारोती मरसकोल्हे (वय ५७) याच्याविरुद्ध भद्रावती पोलिसांनी भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५२.५ सेंटीमीटर लांबीची तलवार जप्त केली असून, या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजय मिश्रा हे १५ ऑक्टोबर रोजी पोलीस पथकासह गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, भंगाराम वॉर्ड येथील मुन्ना मर्सकोळे हा तलवार बाळगून परिसरातील नागरिकांना धाक दाखवित आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन चौकशी केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताच्या घरी जाऊन त्याला आवाज दिल्यानंतर तो घराबाहेर आला. पोलिसांनी त्याची ओळख पटवून तलवार बाळगण्याबाबत विचारणा केली असता, त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर पंचांसमक्ष घराची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान घरातील एका खोलीत प्लास्टिकच्या ड्रममध्ये तलवार आढळून आली. पोलिसांनी ती जप्त केली. सदर तलवारीची लांबी ५२.५ सेंटीमीटर असून, तिची अंदाजे किंमत ५०० रुपये असल्याचे अहवालात नमूद आहे.
या प्रकरणी मुन्ना मारोती मरस्कोल्हे याच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा १९५९ मधील कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.



