श्री व्यंकटेश महाविद्यालयात जागतिक कर्करोग जागरूकता दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा व भारतीय जैन संघटना, शाखा देऊळगाव राजा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक कर्करोग जागरूकता दिनाचे औचित्य साधून कर्करोग : जागरूकता, महत्त्व आणि आव्हाने’ या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
दिनांक ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग जागरूकता दिन म्हणून संपूर्ण विश्वात साजरा केला जातो. या दिवसानिमित्त श्रीमंत राजे विजयसिंह जाधव, वंशपारंपारिक विश्वस्त श्री बालाजी संस्थान देऊळगाव राजा व अध्यक्ष श्री व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा यांच्या प्रेरणेने व भारतीय जैन संघटना शाखा देऊळगावराजा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. प्रवीण वानखेडे, डॉ. वैभव वायाळ व वैद्य शंकर तलबे हे लाभले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पियुष खडकपूरकर, शहर अध्यक्ष, भारतीय जैन संघटना, शाखा देऊळगाव राजा, मनीष कोठेकर विदर्भ सचिव भारतीय जैन संघटना, श्री सन्मती जैन, सदस्य राज्य कार्यकारणी, भारतीय जैन संघटना, राजकुमार कछोट जिल्हा सदस्य, भारतीय जैन संघटना हे उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान मार्गदर्शन करताना देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रवीण वानखेडे यांनी कर्करोगाचे प्रकार व त्यावरील उपचार पद्धती विषयी विस्तृत माहिती दिली. दुसरे मार्गदर्शक अस्थीरोग तज्ज्ञ डॉ. वैभव वायाळ यांनी हाडांशी संबंधित कर्करोगाविषयी सविस्तर माहिती दिली. पुढे मार्गदर्शन करताना उपचार पद्धतीतील मर्यादाविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती दिली. तिसरे मार्गदर्शक वैद्य शंकर तलबे, यांनी कर्करोगाविषयी माहिती देताना आयुर्वेद व निसर्गोपचारांचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर गोरे यांनी आजच्या पिढीतील जंक फूड व फास्ट फूड तसेच तंबाखूजन्य पदार्थांविषयी वाढत्या आकर्षणाविषयी चिंता व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, कर्करोगसारख्या जीवाघेण्या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक स्वतःला जंक फूड व फास्ट फूड तसेच तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे.
या कार्यशाळेसाठी श्री. दयासिंग बावरे (पत्रकार), श्री. मुन्ना ठाकूर (पत्रकार), यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, भारतीय जैन संघटना, शाखा देऊळगाव राजाचे पदाधिकारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती ढोकले यांनी केले, प्रास्ताविक डॉ. किरण मोगरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर शिंब्रे यांनी केले.