ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठीच्या संवर्धनासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची आग्रही भूमिका ; चंद्रपुरात मराठी भाषा भवन उभारण्यास मंत्री उदय सामंत यांची मान्यता!

विधानसभेतील चर्चेतील आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आ. मुनगंटीवार यांची मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक

चांदा ब्लास्ट

चंद्रपूरच्या सांस्कृतिक आणि भाषिक वैभवात मोलाची भर पडणार ; मराठी भाषा भवन उभारण्याबाबत मंत्र्यांकडून बैठकीत आश्वासन

चंद्रपूर :- मराठी भाषेचे जतन आणि संवर्धनाच्या चळवळीला चंद्रपुरात आता भक्कम संस्थात्मक आधार मिळणार आहे. मराठी भाषेचे समृद्ध वैभव जपत तिचा ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोजगाराच्या विविध क्षेत्रांतील प्रभावी वापर वाढविण्यासाठी विधानसभेत आग्रही व अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना आता ठोस दिशा मिळाली आहे. विधानसभेतील चर्चेदरम्यान चंद्रपूरमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा भवन उभारण्याबाबत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या पूर्ततेच्या दृष्टीने आज आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री उदय सामंत यांच्यासोबत दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेतली. या बैठकीत चंद्रपूरमध्ये मराठी भाषा भवन उभारण्यास मंत्री उदय सामंत यांनी मान्यता दर्शविली. त्यामुळे मराठी भाषेचे जतन, संवर्धन आणि विकास यासाठी चंद्रपुरात एक महत्त्वपूर्ण केंद्र उभारण्याच्या दिशेने पुढचे पाऊल पडले आहे.

मराठी भाषेचे समृद्ध वैभव जपत ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण आणि रोजगाराच्या विविध क्षेत्रांत मराठीचा प्रभावी वापर वाढविण्याची आवश्यकता आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतील अर्धा तास चर्चेदरम्यान ठामपणे मांडली होती. मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेला आधुनिक काळातील गरजांची जोड देण्यासाठी संशोधन, साहित्य, भाषा प्रशिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थात्मक केंद्रांची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली होती. याच अनुषंगाने चंद्रपूरमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा भवन उभारण्याची मागणीही त्यांनी केली होती. या चर्चेदरम्यान मंत्री उदय सामंत यांनी चंद्रपूरमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा भवन उभारण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या अनुषंगाने आज झालेल्या बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी या विषयाचा पुन्हा आग्रह धरला. त्यावर मंत्री उदय सामंत यांनी चंद्रपूरमध्ये मराठी भाषा भवन उभारण्यास मान्यता दर्शविली.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूरमध्ये साकारण्यात येणारे मराठी भाषा भवन हे मराठी साहित्य, भाषा संशोधन, ग्रंथसंपदा, साहित्यिक आणि सांस्कृतिक उपक्रम तसेच भाषा प्रशिक्षणाचे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार आहे. या माध्यमातून नव्या पिढीला मराठी भाषेचा समृद्ध इतिहास, साहित्यिक परंपरा आणि भाषेचे सामर्थ्य जाणून घेण्याची संधी मिळेल. मराठीच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासोबतच आधुनिक ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात मराठीचा वापर अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने हे भवन महत्त्वपूर्ण योगदान देईल.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत मांडलेली अभ्यासपूर्ण भूमिका आणि त्यानंतर सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे चंद्रपूरमध्ये मराठी भाषा भवन उभारण्याच्या संकल्पनेला आता मूर्त स्वरूप मिळण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपत तिच्या संवर्धन आणि विकासासाठी संस्थात्मक व्यासपीठ उभे करण्याचा हा उपक्रम चंद्रपूरच्या सांस्कृतिक वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये