ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संविधान दिन साजरा करण्यासोबतच संविधानाचे आचरणही महत्त्वाचे – नरेन गेडाम

राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त व्याख्यान; नागरिकांच्या कर्तव्यांवर केले मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ भारतीय संविधान हे केवळ देशाचा मूलभूत कायदा नसून भारतीय समाजाच्या कल्याणाचा आधार आणि सामाजिक परिवर्तनाचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. आपण संविधान वाचतो, त्याचा गौरव करतो; मात्र प्रत्यक्ष जीवनात संविधानातील मूल्यांचे किती अनुकरण करतो, याचे आत्मपरीक्षण करणे अधिक महत्त्वाचे आहे. संविधान दिन साजरा करणे योग्य असले तरी संविधानातील विचारांचे आचरण आणि त्यावर चिंतन करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते नरेन गेडाम यांनी केले.

सरदार पटेल मेमोरियल सोसायटी (ट्रस्ट), चंद्रपूर द्वारा संचालित राजीव गांधी अभियांत्रिकी, संशोधन व तंत्रज्ञान महाविद्यालय (RCERT), चंद्रपूर येथे संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे आणि राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे समन्वयक डॉ. धनंजय डुंबेरे उपस्थित होते.

भारतीय संविधानाच्या ऐतिहासिक वाटचालीवर प्रकाश टाकताना गेडाम म्हणाले की, २६ नोव्हेंबर १९४९ रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यांचा उल्लेख संविधानाचे शिल्पकार म्हणून केला जातो. संविधानाने नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान केले असून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये भारतीय लोकशाहीचा पाया आहेत.

संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असून तो प्रत्येक नागरिकाच्या जीवनाशी जोडलेला आहे. निसर्गात कोणीही उच्च किंवा नीच नसते, सर्व समान आहेत, ही समानतेची भावना संविधानाच्या माध्यमातून समाजात रुजविणे आवश्यक आहे. केवळ सामाजिक समानताच नव्हे, तर आर्थिक समानतेच्या दिशेनेही वाटचाल होणे गरजेचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचा संदर्भ देत त्यांनी समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक मतभेदांचाही उल्लेख केला. जुन्या सामाजिक व्यवस्थेतील विचारांचा प्रभाव आजही विविध चर्चांमधून दिसून येतो, असे ते म्हणाले.

सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना गेडाम यांनी देशाच्या भवितव्याबाबत काही महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित केले. आदिवासी समाजाचे अधिकार, त्यांच्या समस्या आणि वेदना शासनापर्यंत पोहोचतात का, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. संविधानातील अधिकार आणि तरतुदींची अंमलबजावणी करणे ही केवळ सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. संविधानाचा लाभ घेण्याबरोबरच त्यातील मूल्यांचे पालन करण्याची जबाबदारीही आपण पार पाडली पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

संविधान हा भारतीयांचा आत्मा आहे. आपण खरोखर संविधानानुसार जगतो का? संविधानाचा मूळ विचार आपण विसरत चाललो आहोत का? असे आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त करणारे प्रश्न उपस्थित करून संविधानातील मूल्यांचे दैनंदिन जीवनात पालन करणे आणि त्यावर सातत्याने चिंतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी आपल्या मार्गदर्शनात “संविधान हा भारतीयांचा आत्मा आहे. मात्र, आपण खरोखरच संविधानानुसार जगतो का, संविधानातील मूल्यांचे आपल्या दैनंदिन जीवनात पालन करतो का, याचे प्रत्येकाने आत्मपरीक्षण व चिंतन करणे गरजेचे आहे,” असे प्रतिपादन केले. संविधानाचा केवळ गौरव करण्यापेक्षा त्यातील विचार आणि मूल्ये आपल्या आचरणात आणणे अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभारप्रदर्शन डॉ. स्मिता काळे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये