कोरपना काँग्रेसचा संविधानाच्या संरक्षणासाठी एल्गार!
लोकशाही मूल्ये, संविधानिक हक्क आणि सामाजिक न्यायाच्या रक्षणाचा निर्धार.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :- भारतीय संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्यांचे जतन, संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले मूलभूत अधिकार आणि सामाजिक न्यायाची संकल्पना जनमानसात रुजविण्याच्या उद्देशाने कोरपना तालुका काँग्रेसच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान बचाव आंदोलन आयोजित करण्यात आले.
यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत मूल्यांच्या संरक्षणाचा संकल्प करण्यात आला. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून देशातील प्रत्येक नागरिकाला समान अधिकार, सन्मान आणि न्याय देणारा लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ आहे. त्यामुळे संविधानिक मूल्यांचे जतन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ काँग्रेस नेते तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजयराव बावणे होते. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव बावणे, गडचांदूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष संजय मेंढी, शैलेश लोखंडे, उमेश राजुरकर, गडचांदूर शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील झाडे, कोरपना नगरपंचायतीचे उपाध्यक्ष इस्माईल शेख, माजी पंचायत समिती सभापती श्यामभाऊ रणदिवे, कोरपना शहर काँग्रेस अध्यक्ष प्रशांत लोडे, संतोष महाडोळे, नगरसेवक निसार शेख, वहाब भाई, भाऊजी चव्हाण, घनश्याम नांदेकर, अनिल गोंडे, नगरसेवक तुषार बावणे, रोशन आस्वले, रोशन मरापे, सुनील कोहचडे यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.



