देऊळगाव माहीजवळ भरधाव क्रुझर उलटली; १४ बालके जखमी
वाकी येथील मुलांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा अपघात; चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालविल्याने क्रुझर गाडी पलटी होऊन झालेल्या अपघातात १४ बालके जखमी झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास देऊळगाव माही परिसरात घडली. या अपघातात चार बालकांना दुखापत झाली असून, अन्य दहा बालकांनाही किरकोळ जखमा झाल्याची माहिती पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी क्रुझर चालकाविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरज बंसीधर पैठणकर (रा. देऊळगाव माही, ता. देऊळगाव राजा) हा एमएच २१ बीएफ ०६३५ क्रमांकाची क्रुझर गाडी चालवत होता. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास देऊळगाव माहीपासून पूर्वेकडे सुमारे २० किलोमीटर अंतरावर त्याने वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने गाडी पलटी झाली.
या वाहनामध्ये प्रवास करणारे सिद्धेश आनेश्वर पवार (वय ११, रा. वाकी बु.), आर्यन अमोल झिने (वय ४, रा. वाकी खुर्द), परवेश हिरो पवार (वय ९, रा. वाकी बु.) आणि रिया कैलास भोसले (वय ७, रा. वाकी बु.) हे जखमी झाले. याशिवाय रुद्र आकाश वाकोडे (वय ११), आस्थ विकास वाकोडे (वय ११), अनुश्री भगवान जायभाये (वय ८), आरुषी विश्वनाथ जायभाये (वय १०), प्रज्ञा प्रविण जायभाये (वय १०), प्रियंका प्रविण जायभाये (वय ६), अखिल पवनेर भोसले (वय ८), श्रीरशा पवनेर भोसले (वय ६) आणि आरोध्या मुन्ना पवार (वय ८) या बालकांनाही किरकोळ दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी वाकी बु. येथील पवनेर म्हलारी भोसले (वय २६) यांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी क्रुझर चालक सुरज बंसीधर पैठणकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५ (अ) आणि १२५ (ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
२५ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४७ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस ठाण्यातील पोलीस हेडकॉन्स्टेबल भास्कर सानप यांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख करीत आहेत.
भरधाव वाहनामुळे अनेक बालकांच्या जिवाला धोका निर्माण झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे..



