सुटीच्या दिवशीही महसूल विभागाची धडक; अंढेरा फाट्यावर रेतीचा टिप्पर जप्त
अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांना दणका; अप्पर तहसीलदारांच्या पथकाची कारवाई
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : सुटीच्या दिवशीही महसूल विभागाने अवैध रेती वाहतुकीविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. अप्पर तहसीलदारांच्या पथकाने गस्तीवर असताना अंधेरा फाटा येथे अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर जप्त केला. ही कारवाई २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.
अप्पर तहसीलदार देऊळगाव राजा प्रमोद खमाट यांचे पथक परिसरात गस्त घालत असताना अंढेरा फाटा येथे रेतीची अवैध वाहतूक करणारा टिप्पर आढळून आला. पथकाने तत्काळ कारवाई करत सदर टिप्पर ताब्यात घेतला. पुढील कारवाईसाठी हा टिप्पर अंढेरा पोलीस ठाण्यात अटकाव करून ठेवण्यात आला आहे.
ही कारवाई अप्पर तहसीलदार प्रमोद खमाट यांच्या पथकाने केली. या पथकात ग्राम महसूल अधिकारी तेजस शेटे आणि ग्राम महसूल अधिकारी संजय हांडे यांच्यासह महसूल विभागाचे कर्मचारी सहभागी होते.
सुटीच्या दिवशीही महसूल विभागाच्या पथकाने गस्त घालून अवैध रेती वाहतुकीवर कारवाई केल्याने रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत. अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने अशाच प्रकारच्या कारवाया सातत्याने सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



