ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावितरणच्या पाथरी शाखेत कारभाराचा बोजवारा!

"बिल वसुलीत तत्पर महावितरण, पण ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणात उदासीनता!"

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

 कनिष्ठ अभियंत्यांची अनुपस्थिती, 50 ते 60 गावांतील वीज ग्राहक त्रस्त ; तक्रारींचा निपटारा कोण करणार?

सावली :_ महावितरणच्या पाथरी येथील शाखा कार्यालयातील कारभारावरून परिसरातील वीज ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील पाच ते सहा महिन्यांपासून कनिष्ठ अभियंत्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. परिणामी, सर्वसामान्य वीज ग्राहकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी आणि तक्रारींचे निराकरण करून घेण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

पाथरी शाखा कार्यालयांतर्गत जवळपास 50 ते 60 गावांचा वीजपुरवठा व संबंधित कामकाजाचा कारभार चालतो. मात्र, कनिष्ठ अभियंत्यांच्या अनुपस्थितीमुळे या गावांतील वीज ग्राहकांच्या अडचणी वाढत असल्याचे चित्र आहे. वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड, वीजबिलासंबंधी समस्या, नवीन जोडणी तसेच इतर तक्रारींसाठी ग्राहकांना कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असल्याची परिस्थिती असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य ग्राहकांना वीजविषयक तक्रारींच्या निवारणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. कार्यालयात जबाबदार अधिकारी उपलब्ध नसल्यास नागरिकांनी आपली समस्या नेमकी कोणाकडे मांडायची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महावितरणच्या कार्यालयात नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आणि त्यावर तातडीने कार्यवाही करण्यासाठी सक्षम यंत्रणा असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ग्राहकांची गैरसोय होत असल्याचे दिसून येत आहे.

याशिवाय शाखा कार्यालयातील अधिकारी यांचा उपस्थितीबाबत, तसेच प्रलंबित तक्रारींबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल माहिती घेणे गरजेचे आहे. केवळ कागदोपत्री कामकाज न करता प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करून ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे!

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाथरी शाखा कार्यालयातील कामकाजाची प्रत्यक्ष पाहणी करावी, कनिष्ठ अभियंत्यांच्या उपलब्धतेबाबत स्पष्टता आणावी, आवश्यक अधिकारी याची कायम स्वरूपी नियुक्ती करावी तसेच प्रलंबित तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

प्रश्न एकच… वीज ग्राहकांनी नियमित वीजबिल भरायचे, पण त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जबाबदार अधिकारीच उपलब्ध नसतील, तर न्याय मागायचा कोणाकडे?असा प्रश्न ग्राहकापुढे निर्माण झाला आहे.

   “माझ्याकडे सिंदेवाही आणि पाथरी अशा दोन शाखांचा अतिरिक्त कार्यभार असल्यामुळे सध्या आठवड्यातून एकदा पाथरी शाखा कार्यालयात उपस्थित राहतो. त्यामुळे काही कामांमध्ये अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली आहे. मात्र, लवकरच पाथरी येथे कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंत्यांची नियुक्ती होईल. त्यानंतर वीज ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण होऊन त्यांच्या समस्या दूर होतील.”

टी. जी. रामटेके,कनिष्ठ अभियंता,(प्रभारी)महावितरण, पाथर

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये