कॅनलच्या पाण्यामध्ये आढळला वाघाचा मृतदेह
फत्तापूर रोडवरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती :_ बारव्हा येथील शेतशिवारात एका वाघाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. फत्तापूर रोडवरील कॅनलमध्ये वाघ मृतावस्थेत पडल्याचे उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, बारव्हा येथील सुरेश मडावी हे नेहमीप्रमाणे लाकडे गोळा करण्याकरिता शेतशिवारात गेले होते. यादरम्यान त्यांना कॅनलमध्ये एका मृत वाघाचे दर्शन झाले. हा धक्कादायक प्रकार पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ घरी परतत गावातील तरुणांना याची सविस्तर माहिती दिली.
पोलीस पाटील विद्या लढी यांना माहिती मिळताच त्यांनी पोलीस स्टेशन आणि वन विभाग अधिकाऱ्याला कळविले वन विभाग अधिकारी येऊन पंचनामा चालू केला व वनविभाग अधिकारी यांनी वाघाला आपल्या ताब्यात घेऊन पोस्टमार्टम साठी नेले मात्र, या दिमाखदार आणि आक्रमक वन्यप्राण्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. विषबाधा, आपत्कालीन शिकार की इतर काही कारण, याचा शोध घेण्यासाठी वनविभागाचे अधिकारी पथक कसून तपास करत असून, मृत्यूचे चौकशीनंतर सत्य समोर येईल.



