पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण
नमो उद्यानसह विविध रस्ते; ५ कोटी ५० लाखांचा खर्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ नगरपरिषद क्षेत्रात वैशिष्टपूर्ण निधी अंतर्गत 5 कोटी 50 लाख रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या इतवारा बाजार येथील नवीन मटन मार्केट, प्रभाग क्रमांक 4, प्रभाग क्रमांक 12 मधील सिमेंट रस्ता, इसाजी ले-आऊट मधील नमो उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, मुख्याधिकारी विजय देशमुख, बांधकाम सभापती राखी पांडे, नगरसेविका वंदना चामटकर आदी उपस्थित होते.
शहरातील जेष्ठ नागरिक, बालके व सर्वसामान्य नागरिकांसाठी एक विरंगुळा केंद्र असावे, यासाठी शासनाने नमो उद्यास योजना सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पर्यावरणपुरक चांगल्या दर्जाची उद्याने निर्माण केली जात आहे. वैशिष्टपूर्ण निधीतून जिल्ह्यात 10 नमो उद्याने तयार करण्यात येत आहे. एक कोटी रुपये खर्च करुन तयार करण्यात आलेल्या या उद्यानाची देखभाल देखील महत्वाची आहे. यासाठी परिसरातील नागरिकांनी गणपती उत्सव समिती प्रमाणे एक समिती तयार करुन उद्यानाची देखभाल करावी, अशी अपेक्षा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी नमो उद्यानाच्या लोकार्पण प्रसंगी केली.
राज्य शासनाने सुरु केलेल्या योजनेंतर्गत वर्धा शहरात तयार करण्यात आलेले जिल्ह्यातील पहिले नमो उद्यान असून पर्यावरणाचा विचार करुन उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या उद्यानामुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडण्यासोबत नागरिकांना करमणूकीचे एक साधण होणार आहे. भविष्यात उद्यानाच्या दुरुस्तीचे काम नगरपरिषद करणार असले तरी परिसरातील नागरिकांनी समिती तयार करुन देखभालीचे काम करावे, असे आवाहन सुधीर पांगुळ यांनी केले.
तत्पूर्वी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ व मान्यवरांच्या उपस्थितीत इतवारा येथील नवीन बांधण्यात आलेले मटन मार्केट, प्रभाग क्र.12 मधील सिमेंट रस्ता, प्रभाग क्रमांक 4 मधील रस्ता बांधकामाचे लोकार्पण तसेच मस्जीद चौक येथील रस्ता बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी केले. कार्यक्रमाला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



