चंद्रपूरच्या क्रीडा वैभवाला मिळणार नवी झेप; वीर बाबुराव शेडमाके क्रीडा संकुलाच्या १३७ कोटींच्या प्रस्तावाला गती!
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निवेदन; प्रशासकीय मान्यतेसाठी लवकरच विशेष बैठक आयोजित होणार

चांदा ब्लास्ट
आ.मुनगंटीवार यांचा ग्रामीण व आदिवासी भागातील गुणवंत खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याचा ध्यास
चंद्रपूर – क्रीडा हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून युवकांच्या सामर्थ्याला दिशा देणारे, शिस्त आणि जिद्दीची रुजवण करणारे तसेच जिल्ह्याची ओळख राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणारे प्रभावी माध्यम आहे, या ठाम भूमिकेतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरच्या क्रीडा विकासासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे. याच क्रीडाध्यासातून मौजा दाताळा येथे १३७ कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक वीर बाबुराव शेडमाके क्रीडा संकुलाच्या प्रस्तावाला गती मिळावी, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची मुंबई येथील वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर केले. या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री महोदयांनी विशेष बैठक आयोजित करण्याबाबत सकारात्मक आश्वासन दिले असून, लवकरच यासंदर्भात बैठक होणार आहे.
नवीन चंद्रपूर विकास योजनेअंतर्गत मौजा दाताळा येथे वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने साकारण्यात येणाऱ्या भव्य क्रीडा संकुलासाठी १६ एकर जागा आरक्षित करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या क्रीडा क्षेत्राला नवी उंची देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय असून, स्थानिक खेळाडूंच्या कौशल्याला हक्काचे व्यासपीठ आणि भावी पिढीच्या क्रीडा स्वप्नांना भक्कम आधार देणारा ठरणार आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे क्रीडा क्षेत्रातील योगदान केवळ संकल्पना आणि घोषणांपुरते मर्यादित नसून, जिल्ह्यात उभारलेली क्रीडा संकुले, स्टेडियम आणि विविध क्रीडा सुविधांमधून त्यांच्या क्रीडाप्रेमाची आणि विकासदृष्टीची साक्ष मिळते. खेळाडूंना दर्जेदार सराव सुविधा, स्पर्धांसाठी सक्षम व्यासपीठ आणि आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटविण्याची संधी मिळावी, यासाठी त्यांनी सातत्याने क्रीडा पायाभूत सुविधांच्या निर्मितीला प्राधान्य दिले आहे.
याच क्रीडादृष्टीचा आणखी एक प्रेरणादायी आविष्कार म्हणजे ‘मिशन शौर्य’ या मोहिमेच्या माध्यमातून १७ ते १८ वयोगटातील आदिवासी युवकांमधील असामान्य जिद्द, साहस आणि सुप्त सामर्थ्याला जागतिक व्यासपीठ मिळाले. या मोहिमेतील पाच आदिवासी युवकांनी जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर करून इतिहास घडविला. त्यांच्या या अतुलनीय कामगिरीचा गौरव देशाचे पंतप्रधान युगपुरुष नरेंद्रजी मोदी यांनी १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात विशेष उल्लेखाने केला. क्रीडा सुविधा उभारून खेळाडू घडविणे आणि दुर्गम भागातील आदिवासी युवकांच्या स्वप्नांना थेट एव्हरेस्टच्या शिखरापर्यंत झेप घेण्याचे बळ देणे, या दोन्ही आघाड्यांवरील आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कार्य त्यांच्या दूरदृष्टीची, क्रीडाप्रेमाची आणि युवा सामर्थ्यावरील अढळ विश्वासाची प्रचीती देणारे आहे.
‘मिशन ऑलिंपिक २०३६’च्या ध्येयाने चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी मुलांना क्रीडा प्रशिक्षण देण्याचे कामही सुरू आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांमध्ये प्रचंड क्रीडाक्षमता असून त्यांना योग्य प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि संधीचे व्यासपीठ मिळाल्यास ते राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करू शकतात, असा विश्वास आमदार मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
वीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने साकारण्यात येणारे हे क्रीडा संकुल केवळ अत्याधुनिक क्रीडा सुविधांचे केंद्र न राहता, गोंडवाना भूमीचा गौरवशाली इतिहास, आदिवासी युवकांचे सामर्थ्य आणि भावी पिढीच्या स्वप्नांना नवी भरारी देणारे प्रेरणास्थान बनेल. चंद्रपूरसह संपूर्ण पूर्व विदर्भाच्या क्रीडा क्षेत्राला नवी ओळख मिळवून देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे खेळाडूंच्या गुणवत्तेला बळ देणारे आणि नव्या पिढीच्या क्रीडास्वप्नांना आकार देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.



