१२ महिन्यांचा कोविड प्रोत्साहन भत्ता थकीत, ३२ आशा स्वयंसेविकांची जनआक्रोश रॅली
सहा दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू, थकीत रक्कम तातडीने देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घूस, चंद्रपूर : कोविड-१९ महामारीच्या काळात सेवा बजावणाऱ्या घुग्घूस येथील ३२ आशा स्वयंसेविकांना १२ महिन्यांचा प्रोत्साहन भत्ता अद्याप मिळाला नसल्याने मंगळवार, दिनांक १० नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य जनआक्रोश रॅली काढण्यात आली. मागील सहा दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनांतर्गत काढण्यात आलेल्या या रॅलीत आशा स्वयंसेविकांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार निदर्शने केली.
कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात आशा स्वयंसेविकांनी स्वतःच्या जीवाची आणि आरोग्याची पर्वा न करता जनतेची सेवा केली होती. मात्र, आपल्या सेवेचा प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी त्यांना अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. घुग्घूस नगर परिषदेच्या वतीने काही महिन्यांची रक्कम आशा स्वयंसेविकांच्या खात्यात जमा करण्यात आली असली, तरी अद्याप १२ महिन्यांची थकीत रक्कम शिल्लक असल्याचा दावा आंदोलनकर्त्या आशा स्वयंसेविकांनी केला आहे.
या रॅलीची सुरुवात साप्ताहिक बाजार रंगमंच येथून झाली. त्यानंतर तिलक नगर, नंबर २/पोला मैदान, गांधी चौक, बँक ऑफ इंडिया आणि बसस्थानक मार्गे रॅली घुग्घूस नगर परिषद कार्यालयावर धडकली. त्यानंतर पुन्हा आंदोलनस्थळी येऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी आशा स्वयंसेविकांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांच्या विरोधातही घोषणा देत प्रशासनाप्रती तीव्र नाराजी व्यक्त केली.
दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळातही महिलांना आपल्या हक्काच्या पैशांसाठी आंदोलन करावे लागत आहे. अनेक कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळूनही आशा स्वयंसेविका मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलनस्थळी ठामपणे बसून आहेत. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, कोरोना महामारीच्या काळात आशा स्वयंसेविकांनी जनतेची सेवा केली आहे. आता त्यांच्या हक्काचा थकीत प्रोत्साहन भत्ता देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. केवळ तोंडी आश्वासने न देता १२ महिन्यांची संपूर्ण थकीत रक्कम तातडीने खात्यात जमा करण्यात यावी. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनाला सुरेश मल्हारी पाईकराव आणि रीता फकरू देशकर यांचे मार्गदर्शन लाभले. या रॅलीत घुग्घूस येथील सर्व ३२ आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या.
१२ महिन्यांचा कोविड प्रोत्साहन भत्ता तातडीने देण्याची मागणी करत आंदोलनकर्त्या आशा स्वयंसेविकांनी न्याय मिळेपर्यंत आपला संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.



