ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांना बारमाही शेतरस्ते उपलब्ध करून देणार _ पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

दत्ताजी मेघे यांच्या जयंतीनिमित्त पवनार येथे जिल्हास्तरीय पाणंद रस्त्यांचे भुमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा : शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्ते उपलब्ध व्हावेत, शेतीची मशागत सुलभ व्हावी तसेच शेतमालाची वाहतूक कोणत्याही अडथळ्याविना करता यावी, यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. या रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेती व्यवस्थेला बळकटी मिळणार असून शेतकऱ्यांच्या दैनंदिन अडचणी दूर करण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.

दत्ताजी मेघे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्हास्तरीय पाणंद रस्त्याच्या कामांचे भुमिपूजन पवनार येथील मामा-भाचा समाधीजवळ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी खासदार रामदास तडस, माजी आमदार सागर मेघे, स्मिता मेघे, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते समितीचे सहअध्यक्ष अशोक कलोडे, सुनील गफाट, संजय गाते, अजय गांडोळे आदी उपस्थित होते.

शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असून शेतकऱ्यांना शेतीच्या कामांसाठी वर्षभर शेतापर्यंत पोहोचणे आवश्यक असते. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही रस्ते उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या रस्त्यांमुळे ट्रॅक्टर, कृषी यंत्रसामग्री तसेच इतर वाहनांची शेतापर्यंत ये-जा सुलभ होईल. पेरणी, नांगरणी, कापणी यांसारख्या शेतीच्या विविध कामांसाठी लागणारी साधने वेळेत शेतापर्यंत पोहोचविता येतील. तसेच कापणीनंतर शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी होणारा त्रास कमी होऊन वाहतुकीचा वेळ आणि खर्च वाचण्यास मदत होईल, असे पालकमंत्री डॉ. भोयर म्हणाले.

पाणंद रस्ते हे केवळ शेतापर्यंत पोहोचण्याचे साधन नसून ग्रामीण भागाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधा आहेत. या रस्त्यांच्या विकासामुळे शेतीची उत्पादकता वाढविण्यास, कृषी क्षेत्रातील आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर सुलभ करण्यास आणि शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सुरवातीला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी विनोद बोकडे यांच्या शेताजवळ कुदळ मारून पाणंद रस्त्याचे भूमिपूजन केले. यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*जिल्ह्यात होणार 673 पाणंदरस्ते*

जिल्ह्यात एकून 673 पाणंदरस्ते करण्यात येणार आहे. त्यात आर्वी विधानसभा मतदारसंघात 112, देवळी मतदारसंघात 162, हिंगणघाट मतदारसंघात 198 तर वर्धा विधानसभा मतदारसंघात 201 कामांचा समावेश आहे. या कामांवर एकून 27 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. सदर कामे गतीने आणि कालमर्यादेत करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये