क्रीडा क्षेत्रासाठी ऐतिहासिक क्षण : प्राध्यापक डॉ. विशाल शिंदे यांच्या ‘स्मार्ट फिटनेस उपकरणाला भारत सरकारचे पेटंट
गोंडवाना विद्यापीठातर्फे जाहिर सत्कार : ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांचा फिटनेस सुधारण्यास होणार मदत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक प्राध्यापक डॉ. विशाल निळकंठराव शिंदे यांनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण ‘स्मार्ट फिटनेस उपकरणाची भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने दखल घेत, त्याला अधिकृत पेटंट (Patent) मंजूर केले आहे. गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली अंतर्गत क्रीडा क्षेत्रात अशा प्रकारचे पेटंट मिळवणारे डॉ. विशाल शिंदे हे पहिलेच प्राध्यापक ठरले असून, हा विद्यापीठ आणि संपूर्ण क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद क्षण आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशाबद्दल गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली व निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय, भद्रावती यांच्या वतीने नुकताच त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
पारंपरिक साधनांमधील त्रुटींवर मात
सध्या शाळांमध्ये वापरली जाणारी बहुतांश फिटनेस साधने केवळ साध्या शारीरिक हालचालींचे मोजमाप करतात. त्यामध्ये विद्यार्थ्यांची वैयक्तिक आरोग्य माहिती, सांस्कृतिक संदर्भ किंवा इंटरनेट नसताना ऑफलाइन वापर करण्याची सुविधा उपलब्ध नसते. हीच अडचण ओळखून डॉ. विशाल शिंदे यांनी हे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित केले आहे.
असे कार्य करते हे ‘स्मार्ट उपकरण’:
• अत्याधुनिक सेन्सर्स आणि वैयक्तिक फिटनेस: हे उपकरण प्रगत मोशन सेन्सर आणि शारीरिक सेन्सरचा वापर करून विद्यार्थ्यांच्या हालचाली, व्यायामाची तीव्रता आणि हृदयगती अचूक मोजते. मिळालेल्या डेटाच्या आधारे विद्यार्थ्याच्या वय, क्षमता आणि आरोग्य स्थितीनुसार वैयक्तिक फिटनेस अॅक्टिव्हिटी आणि गेम्स तयार केले जातात.
• भारतीय खेळांचा समावेश व ऑफलाइन कार्य: यामध्ये भारतीय पारंपरिक खेळ आणि स्थानिक क्रीडा प्रकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने कार्य करते, ज्यामुळे इंटरनेट नसलेल्या दुर्गम भागातही याचा वापर शक्य असून नंतर डेटा आपोआप समक्रमित (Sync) होतो.
• स्थानिक भाषेत मार्गदर्शन व मजबूत डिझाइन: स्थानिक भाषेत ऑडिओ-व्हिज्युअल सूचना मिळत असल्याने शिक्षकांची सतत गरज भासत नाही. हे उपकरण हलके, घामरोधक (Sweat-proof) आणि मनगट, घोटा किंवा कपड्यांवर सहज लावता येण्याजोगे आहे. सर्व उपकरणे ठेवण्यासाठी आणि चार्ज करण्यासाठी एक कॉम्पॅक्ट केस देखील प्रदान करण्यात आला आहे.
दिग्गजांकडून कौतुक आणि अभिनंदन
या सत्कार प्रसंगी भद्रावती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे, श्री. प्रशांतभाऊ शिंदे, श्री. रवींद्रभाऊ शिंदे अध्यक्ष. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर, डॉ. वैभव शिंदे सदस्य भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती. सौ. सोनाली कोंडे सदस्य भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. एस. लडके, आणि गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या शारीरिक शिक्षण संचालिका तथा प्राचार्या डॉ. अनिता लोखंडे यांनी डॉ. विशाल शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना डॉ. विशाल निळकंठराव शिंदे यांनी आपल्या या ऐतिहासिक यशाचे श्रेय त्यांच्या मातोश्री श्रीमती निलीमाताई नि. शिंदे यांना दिले.
डॉ. विशाल शिंदे: एक अष्टपैलू आणि मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व
या ऐतिहासिक कामगिरीमागे डॉ. विशाल निळकंठराव शिंदे यांची १४ वर्षांची प्रदीर्घ शैक्षणिक तपश्चर्या आणि क्रीडा क्षेत्रातील दांडगा अनुभव आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून त्यांनी एम.ए. (मराठी), एम.ए. (राज्यशास्त्र), बी.पी.एड., एम.पी.एड. आणि पीएच.डी. (शारीरिक शिक्षण) अशा उच्च पदव्या संपादन केल्या आहेत. ते गोंडवाना विद्यापीठाचे मान्यताप्राप्त पीएच.डी. मार्गदर्शक (Supervisor) म्हणूनही कार्यरत आहेत.त्यांची क्रीडा क्षेत्रातील अष्टपैलू पात्रता थक्क करणारी आहे. डॉ. विशाल शिंदे हे विदर्भ कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण असून, ते गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली शारीरिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष म्हणूनही महत्त्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत. यासोबतच ते ‘फिजिकल एज्युकेशन ऑफ इंडिया’ आणि ‘नॅशनल असोसिएशन ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स सायन्स’चे आजीवन सदस्य आहेत. ते सध्या भद्रावती शिक्षण संस्थेचे कार्यकारी सहसचिव, चंद्रपूर जिल्हा तायक्वांदो असोसिएशनचे अध्यक्ष, आणि विद्यार्थी युवक क्रीडा मंडळ, भद्रावतीचे अध्यक्ष म्हणूनही धुरा सांभाळत आहेत.
उत्कृष्ट खेळाडू ते यशस्वी मार्गदर्शक
डॉ. विशाल शिंदे यांनी स्वतः उत्कृष्ट खेळाडू म्हणून कारकीर्द गाजवली आहे. २५ व्या महाराष्ट्र राज्य रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी रौप्य पदक पटकावले होते. तसेच तायक्वांदोमध्ये त्यांनी ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवला आहे. त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आतापर्यंत तब्बल ६४९ खेळाडूंनी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, वेस्ट झोन आणि अश्वमेध क्रीडा स्पर्धांमध्ये गोंडवाना विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करून मानाचे ‘कलर कोट’ पटकावले आहेत.
त्यांनी क्रीडा विज्ञानात मोलाचे संशोधन केले असून त्यांचे ६ पुस्तक आणि जर्नल्समध्ये १५ संशोधन निबंध प्रकाशित झाले आहेत, तसेच १५० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सेमिनार व वर्कशॉपमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्यांना “स्वामी सविदानंद सरस्वती राज्यस्तरीय युवा पुरस्काराने” देखील सन्मानित करण्यात आले आहे. या अभूतपूर्व गौरवाबद्दल संपूर्ण जिल्ह्यातून आणि क्रीडा जगतातून डॉ. विशाल शिंदे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



