सरदार पटेल महाविद्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती साजरी
"स्वच्छता ही सेवा" राबविला उपक्रम

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :– येथील सरदार पटेल महाविद्यालयात २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग (रासेयो) आणि मेरा युवा भारत (माय भारत) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.
कार्यक्रमानिमित्ताने महाविद्यालयीन परिसरात “स्वच्छता ही सेवा” या संकल्पनेवर आधारित स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. रासेयोचे स्वयंसेवक आणि कार्यक्रम अधिकाऱ्यांनी महाविद्यालयीन परिसरात स्वच्छता करत स्वच्छतेचा संदेश दिला.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी १७ सप्टेंबर रोजी सुरुवात होऊन, महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी २ ऑक्टोबर रोजी पूर्ण झालेल्या या अभियानात विविध उपक्रम घेण्यात आले. “स्वच्छोत्सव” या थीमनुसार सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, स्वच्छ-हरित उत्सव तसेच जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर हे होते. त्यांनी गांधीजींच्या विचारधारेवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना स्वच्छता, अहिंसा आणि सत्य यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी “स्वच्छता हीच खरी सेवा” असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव करून दिली.
याप्रसंगी जागतिक हृदय दिवस निमित्त पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाला रासेयोचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखिल देशमुख, डॉ. उषा खंडाळे, डॉ. वंदना खणके, तसेच शारीरिक शिक्षण विभागाच्या डॉ. पुष्पांजली कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विशेष अतिथी म्हणून मेरा युवा भारत संस्थेचे अॅड. देवा पाचभाई व मंगेश दुबे (APA, MY Bharat) उपस्थित होते. त्यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार मांडून मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयाचे शिक्षकेत्तर कर्मचारी, स्वयंसेवक व विद्यार्थीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.