ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सामुहिक प्रयत्नातून वर्धा जिल्हा विकासाचे ‘मॉडेल’ बनेल – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर

प्रजासत्तादिनानिमित्त पालकमंत्र्यांच्याहस्ते ध्वजारोहण ; 82 हजारावर शेतकऱ्यांना 115 कोटींची वीज माफी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 384 कोटी रुपयांची मदत ; धाम व बोर प्रकल्पासाठी 429 कोटी रुपयांचा निधी ; वर्धेत इन्वेंशन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग सेंटर

वर्धा : जिल्ह्यातील जनतेला दिलेल्या शब्दांची पुर्तता करणे हे माझे कर्तव्य आहे. शेतकऱ्यांसाठी सिंचन, युवकांना रोजगार, महिलांचे सक्षमीकरण, सर्वसामान्यांचे आरोग्य, विद्यार्थ्यांना शिक्षण असोत किंवा सामान्य नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे, असे विविध कल्याणकारी प्रश्न शासनस्तरावर मांडून निकाली काढण्यासाठी कटीबद्ध आहे. सर्वांच्या सामुहिक प्रयत्नातून जिल्हा विकासाचे ‘मॉडेल’ बनेल, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

प्रजासत्ताकदिनानिमित्त पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानात पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याहस्ते ध्वजारोहन झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपस्थित होते. सुरुवातीस पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील शुरविर, शहीदांना नमन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात विकासाचे अनेक नवीन टप्पे आपण गाठतो आहे. विकासाच्या प्रक्रियेत जिल्ह्याला देखील सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. बोर आणि धाम या प्रकल्पासाठी शासनाकडून 429 कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर करून घेतला. यातून वितरण व्यवस्थेची कामे होणार आहे. शेतकऱ्यांचा वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना सुरु केली. जिल्ह्यातील 82 हजारावर पात्र शेतकऱ्यांना आतापर्यंत 115 कोटींची वीज बिल माफी या योजनेद्वारे देण्यात आली आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याची बॅंक आहे. या बॅंकेला पुर्वीप्रमाणे सक्षम करण्यासाठी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी वैयक्तीक पुढाकार घेतला आहे. बॅंकेतून शेतकऱ्यांना पिककर्ज वाटपास सुरुवात झाली आहे. जुन्या ठेवीदारांच्या ठेवी व व्याज टप्प्या-टप्प्याने परत करण्यात येत आहे. आनंदाची बाब म्हणजे नव्याने 17 कोटीच्या ठेवी बॅंकेला प्राप्त झाल्या आहे.

गेल्या वर्षात अवकाळी पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, पुरपरिस्थितीमुळे 1 लाख 93 हजारावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 384 कोटी 91 लाखाच्या मदतीचे वाटप करण्यात आले आहे. सालोड (हिरापुर) येथे आपण विदर्भातील पहिले गोट मार्केट यार्ड स्थापन करतो आहे. पशुपालकांसाठी 4 कोटी रुपये खर्च करून वैरण विकास कार्यक्रम राबविण्यास मंजुरी देण्यात आली. गेल्या वर्षात वन्यप्राण्यांमुळे शेतपिक, पशुधन व मनुष्यहानीच्या 7 हजार 350 घटनांची नोंद झाली. याप्रकरणी नुकसानग्रस्तांना 6 कोटी 84 लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे.

राज्य शासनाने ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरु केली. केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेप्रमाणेच ही योजना राबविण्यात येत आहे. दोनही योजनेतून प्रत्येकी 6 हजार याप्रमाणे जिल्ह्यातील 1 लाख 34 हजार शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 12 हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. पांदन रस्ते शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे आहे. मातोश्री शेत पांदन रस्ते योजनेद्वारे शासन स्तरावरून 924 रस्ते मंजूर झाले आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या वहिवाटीचा मार्ग प्रशस्त होणार आहे.

युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजना शासनाने सुरु केली. जिल्ह्यात या योजनेतून 1 हजार 706 युवकांनी प्रशिक्षण घेतले असून त्यांना 12 कोटी 22 लाखाचे विद्यावेतन देण्यात आले. टाटा टेक्नॅालॅाजीच्या सहकार्याने जागतिक दर्जाचे सेंटर फॅार इन्वेंशन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन ॲन्ड ट्रेनिंग सुरु करतो आहे. यामुळे स्थानिक युवकांना इंडस्ट्री 4.0 नुसार तांत्रिक प्रशिक्षण मिळणार आहे. नाशिक येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विदर्भातील सेंटर वर्धेत होणार आहे. या ठिकाणी युवकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि कौशल्य विकासाचे उत्तम प्रशिक्षण प्राप्त होणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्यावर माझा भर आहे. जिल्हा रुग्णालयात 50 खाटांचे नवीन क्रीटीकल केअर ब्लॅाक आपण सुरु करतो आहे. ब्लॅाकच्या बांधकामासाठी 23 कोटी 75 लक्ष रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. नवजात बालकांसाठी असंसर्गजन्य रोग निदान केंद्र सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रथमच कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन आणि डे केअर किमोथेरपी सेंटर सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यात 7 प्राथमिक आरोग्य केंद्राची बांधणी, 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात मॅाड्युलर ओटी आणि उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.

रामनगर येथील भुखंड धारकांचा प्रश्न आपण सोडवला आहे. येथील शेकडो भुखंडधारकांच्या जमीनी फ्री होल्ड झाल्या. या जमीनींची मालकी आता या रहिवाशांना मिळणार आहे. रामनगर येथे नवीन पोलिस स्टेशन आपण मंजूर करून घेतले. वर्धा, हिंगणघाट व देवळी शहरात 57 ठिकाणी 240 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. पुलगाव आणि आर्वी शहरात 60 ठिकाणी 219 कॅमेरे बसविण्यात येत आहे. जिल्हा पोलिस दलास अत्याधुनिक वाहने देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.

वर्धा शहरालगतच्या 11 मोठ्या ग्रामपंचायतींच्या कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी इंझापूर येथे 4 एकर जागा तसेच 3 कोटी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात 18 मंदिरांना क वर्ग तीर्थक्षेत्रांचा दर्जा देण्यात आला. सालोड येथे इको टुरीझम पार्क, सारंगपुरी तलाव सौंदर्यीकरण, बोर धरण व अभयारण्य विकास, तळेगाव शामजीपंत येथील पाझर तलावाचा विकास, समुद्रपुर व जाम येथील शोभीवंत वृक्ष लागवड अशा कामाना मंजूरी व निधी देण्यात आला आहे.

उमेदच्या प्रत्येक महिलेला लखपती दिदी करण्याचा संकल्प आपण केला आहे. आतापर्यंत 1 लाख 42 हजार महिला लखपती दिदी झाल्या आहे. उमेदच्या महिलांनी 17 शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहे. गटातील महिलांना हक्काचे विक्री केंद्र उपलब्ध करून देण्यासाठी 20 कोटी रुपये खर्च करून उमेद मॉल उभारतो आहे. महिला व बालविकास विभागाची तालुकास्तरीय कार्यालये आपण बांधून देत आहोत. जिल्ह्यातील 755 अंगणवाडी केंद्र सक्षम तर 200 केंद्र स्मार्ट बनवली आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळा आपण आदर्श करतो आहे. पहिल्या टप्प्यात 8 शाळांमध्ये आदर्श शाळा उपक्रम राबविला जात आहे. तसेच पीएमश्री शाळांसाठी अत्याधुनिक कॅाम्प्युटर संच उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आपण बसवितो आहे. शाळांमध्ये स्वच्छतागृहांची निर्मिती, बोलक्या शाळा, दर्जेदार व सुसज्ज वर्गखोल्या यासाठी 12 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही अतिशय महत्वाकांक्षी योजना राज्य शासनाने सुरु केली. ई-केवायसी करतांना चूकीचे पर्याय निवडल्या गेल्याने काही महिलांचा लाभ बंद झाला. अशा सर्व महिलांच्या अर्जांची ग्रामपंचायतस्तरावर शिबिरे घेऊन फेरतपासणी करण्याचे निर्देश मी दिले आहे. त्यामुळे महिलांनी घाबरून जावू नये, सर्व पात्र महिलांना पुन्हा लाभ सुरु होणार आहे, असे पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी सांगितले.

सुरुवातीस पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत व राज्यगितानंतर पोलिस पथकाच्यावतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबिय, उत्कृष्ट काम करणारे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पोलिस, होमगार्ड, स्काऊट गाईडच्या पथकाने पथसंचलन केले. शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच भारतीय सैनिकांच्या शौर्यावर आधारीत ऑपरेशन ‘सिंदुर’ तसेच पोलिसांच्या श्वान पथकाने कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमास स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे कुटुंबिय, विभागप्रमुख अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये