ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

युवारंग–२०२६’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सावली (जि. चंद्रपूर) येथे ‘युवारंग – २०२६’ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन दिनांक २४ ते २६ जानेवारी २०२६ या कालावधीत मोठ्या उत्साहात करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाचे उद्घाटन तालुका वैद्यकीय अधिकारी सावली डॉ. चौधरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली हे उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. चौधरी यांनी क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सशक्तता, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. ऐ. चंद्रमौली यांनी विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातही प्राविण्य मिळवावे, असे आवाहन केले.

महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १०० मीटर धावणे (मुले व मुली), गोळाफेक, क्रिकेट, बॅडमिंटन, रस्सीखेच आदी स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली क्रीडात्मक कौशल्ये सादर केली.

तसेच सांस्कृतिक स्पर्धांमध्ये रांगोळी, पोस्टर स्पर्धा, एकल नृत्य, समूह नृत्य, नक्कल, गायन आदी विविध कलाप्रकारांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित प्रेक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. रंगीबेरंगी रांगोळ्या, सामाजिक संदेश देणारी पोस्टर्स आणि मनमोहक नृत्य-गायनाने संपूर्ण परिसर आनंदी वातावरणाने भरून गेला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवारंग समन्वयक डॉ.प्रेरणा मोडक डॉ. रामचंद्र वासेकर, प्रा.देवीलाल वताखेरे, डॉ. विजयसिंग पवार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, क्रीडा व सांस्कृतिक समिती सदस्य, स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये