ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आक्सापुरातील नळ योजना आठ दिवसांपासून बंद

ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून जबाबदारी झटकण्याचा आरोप; _महिलांसह ‘झेन-जी’ युवकांचा संताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ ग्रामपंचायतीच्या नळ पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने आक्सापूर गावातील पाणीपुरवठा मागील आठ दिवसांपासून ठप्प आहे. सुमारे १ लाख ८० हजार रुपयांची थकीत वीजबिलाची रक्कम असल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून थकीत रकमेत वाढ होत असतानाही ग्रामपंचायतीकडून ती वसूल करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे करंजी गावाचाही प्रभार आहे. करंजी येथील पाणीपुरवठा योजना नियमित सुरू असताना आक्सापुरातीलच पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गोंडपिपरी येथे पत्रकार परिषद घेऊन विविध आकडेवारी मांडली; मात्र गावातील थकीत रक्कम वसूल करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. थकीत वीजबिलाचा प्रश्न सोडवून नळ योजना सुरू करण्याची जबाबदारी कोणाची? असा सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.

तहकूब ग्रामसभेत गावातील २५ ते ३० ‘झेन-जी’ युवकांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामविकास अधिकाऱ्यांना जाब विचारला. नळ योजना बंद का आहे? याला जबाबदार कोण?पाणीपुरवठा पुन्हा कधी सुरू होणार? थकीत रक्कम का वाढत गेली? यांसह विविध प्रश्नांचा भडिमार युवकांनी केला. मात्र, या प्रश्नांवर ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा आरोप युवकांनी केला.

आक्सापुरातील पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न असताना गोंडपिपरी येथे पत्रकार परिषद घेऊन आकडे सांगण्यात प्रशासन व्यस्त आहे; मात्र प्रत्यक्षात गावातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ग्रामविकास अधिकारी नळ योजना सुरू करण्यात अपयशी ठरत असतील, तर गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रश्नात हस्तक्षेप करून तातडीने पर्याय शोधावा, अशी आर्त हाक आक्सापूरवासीयांनी दिली आहे.

नळ योजना तातडीने सुरू न झाल्यास नागरिकांचा रोष आणखी तीव्र होण्याची शक्यता असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये