गोंडपिपरीत बौद्ध महासभेचा भव्य मेळावा; ११ ऑक्टोबरला डॉ. राजरत्न आंबेडकर यांचे मार्गदर्शन
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखेतर्फे आयोजन ; विविध बौद्ध मंडळे, महिला मंडळे व युवक-युवतींचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गोंडपिपरीच्या वतीने रविवार, ११ ऑक्टोबर २०२६ रोजी गोंडपिपरी येथे भव्य बौद्ध महासभेचे आयोजन करण्यात आले आहे. लक्ष्मणराव कुंदोजवार ज्युनियर कॉलेज सभागृह, मेन रोड, गोंडपिपरी येथे दुपारी ३ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार असून, या महासभेत आदरणीय डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर यांचे मार्गदर्शन प्रमुख आकर्षण ठरणार आहे. गोंडपिपरी तालुक्यासह परिसरातील उपासक, उपासिका तसेच धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या दहा उद्दिष्टांची पूर्तता करण्याबरोबरच भारतातील बौद्ध समाजाचे सामाजिक व आर्थिक बळकटीकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. बौद्ध समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने बौद्धांची बुद्धिस्ट बँक उभारण्याच्या संकल्पनेवरही या महासभेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या पुढाकारातून मुंबई, ठाणे व नागपूर येथे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी (बँक) स्थापन करण्यात आली असून, आता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या संस्थेचे भागधारक बनण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम सुरू असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. त्यामुळे बौद्ध समाजाने आर्थिक प्रगतीच्या दिशेने संघटितपणे वाटचाल करावी, असा संदेश या कार्यक्रमातून दिला जाणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद वनकर, अध्यक्ष, जिल्हा चंद्रपूर राहणार असून, कार्यक्रमाचे मनोगत उद्धव नारनवरे, अध्यक्ष, तालुका शाखा गोंडपिपरी व्यक्त करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राहुल शेंडे, राष्ट्रीय महासचिव भारतीय बौद्ध महासभा, बुधाजी वाळविंदे, महाराष्ट्र राज्याध्यक्ष, रविंद्र गुरचळ, राज्य सह-संयोजक AMSC, विजय बनसोड, नागपूर विभागीय अध्यक्ष तसेच आकाश चौरे, नागपूर विभागीय सचिव यांची उपस्थिती राहणार आहे. याशिवाय रूपचंद फुलझेले, वैध मापनशास्त्र अधिकारी गडचिरोली, सुवर्णमाला भगत, सामाजिक कार्यकर्त्या, प्रफुल्ल देवगडे, उद्योजक घुग्घुस, प्रदीप खोब्रागडे, उद्योजक करंजी, ॲड. राकेश कांबळे, वैधानिक सल्लागार, रुपेश निमसरकर, माजी जिल्हा प्रवक्ता चंद्रपूर तसेच अमावास्या निमसरकर, संयोजक बुद्ध विहार स.स.ता. गोंडपिपरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील विविध बौद्ध मंडळे, बौद्ध महिला मंडळे, बौद्ध महिला बचत गट, पुरुष बचत गट, बुद्ध विहार समन्वयक, बौद्ध युवक-युवती संघटना तसेच सर्व बहुजन बांधवांनी या महासभेला उपस्थित राहून उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गोंडपिपरी व भारतीय बौद्ध महासभा नगरी शाखा गोंडपिपरीच्या वतीने करण्यात आले आहे.
“सामाजिक संघटनासोबत आर्थिक सक्षमीकरण” हा या महासभेचा प्रमुख संदेश असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना कृतीची जोड देण्यासाठी गोंडपिपरीत होणाऱ्या या महासभेकडे तालुक्यातील बौद्ध समाजाचे लक्ष लागले आहे.


