कर्जमुक्ती मिळूनही पीक कर्ज नाही ; शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार
मुख्यमंत्री व सहकार मंत्र्यांकडे धाव _ अध्यक्ष खुशाल लोडे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
शासन स्तरावरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला हे खरे आहे, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याला पुन्हा नव्याने पीक कर्जाची अत्यंत आवश्यकता असताना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून नविन पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या संदर्भात सेवा सहकारी संस्था मर्या. मंगरमेंढा र.जि. ६७४, ता. सावली जि. चंद्रपूर चे अध्यक्ष खुशाल था. लोडे यांनी मान. मुख्यमंत्री नाम. देवेंद्रजी फडणवीस साहेब, मान. सहकार मंत्री नाम. बाबासाहेब पाटील व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना मार्फत तहसीलदार सावली यांचेमार्फत दोन स्वतंत्र निवेदने दिली आहेत.
सन २०२६ च्या चालू हंगामातील नविन पीक कर्ज प्रकरणे संस्थेकडे सादर केली असता जिल्हा बँक सन २०२६-२७ चा पिक पेरा नोंद असलेल्या ७/१२ ची मागणी करत आहे. परंतु सन २०२६-२७ चा पिक पेरा अजूनही अपलोडच झालेला नसल्याने ७/१२ वर २०२५-२६ चीच नोंद मिळत आहे. पीक कर्ज वाटपाची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती. शेतकऱ्यांनी २५ सप्टेंबरला अर्ज सादर करून ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली. तरीही जिल्हा बँकेच्या एआरओ यांनी फोनवरून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज वाटू नये असे तोंडी आदेश दिल्याने वाटप ठप्प झाले आहे.
तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी हात उसने पैसे घेऊन, सावकाराकडून कर्ज घेऊन जुन्या पीक कर्जाचे व्याज भरून कर्ज निल केले. आता नविन कर्ज मिळत नसल्याने त्यांची फरफट होत आहे. सेवा संस्था आणि शेतकरी सभासदांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या वर्षीच्या हंगामात अत्यल्प पाऊस, कोरडा दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. पिके पाण्याविना करपत चालली असून उत्पन्नात ६० टक्के घट आली आहे. दुसरीकडे महागडी औषधे, महागडी खते, रोवणीचा खर्च, निंदण खर्च, पीक कापणीचा खर्च गगनाला भिडला आहे. अशा अनेक कारणांनी शेतकरी हतबल झाला असताना बँकेने पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणे म्हणजे *शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम* होय.
शेतकरी खाईल काय अन जगेल काय? अशा वेळी बँकेने आधार देण्याचे काम करायला पाहिजे, परंतु तसे होताना दिसत नाही. शेतकऱ्यांचा वाली कुणी आहे की नाही? मग देश कसा कृषी प्रधान होईल? फक्त मोठमोठ्या सभांमध्ये शेतकऱ्यांचा विषय घेऊन भाषण ठोकण्यापुरता शेतकरी मर्यादित आहे काय? त्याच्या अडचणी दिसत नाहीत काय? शेतात रात्रंदिवस राब राब राबून शेवटी शेतकऱ्याच्या हातात शिल्लक राहते काय? हा सवाल आज प्रत्येक शेतकरी विचारत आहे.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन नविन पीक कर्ज वाटपाची मुदत वाढवून द्यावी. संबंधित चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला आपल्या स्तरावरून पत्राद्वारे नविन पीक कर्ज मंजूर करण्याबत कळविण्यात यावे. केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आमच्या कार्यालयास कळवावा.
अशी नम्र विनंती अध्यक्ष खुशाल लोडे, शेतकरी विविध सेवा सहकारी संस्था, मंगरमेंढा यांनी केली आहे.


