राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला गती – प्राचार्य डॉ. संजय आसुटकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- चिंतामणी महाविद्यालय, घुग्घूस येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासोबतच सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि सेवाभाव विकसित करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) हे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आसुटकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय आसुटकर होते. अध्यक्षीय भाषणातून त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा इतिहास सांगत रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मिळणाऱ्या चालनेविषयी आपला अनुभव कथन केला. महाविद्यालयातील विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. संतोष गोहोकार यांनी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाचे महत्त्व विशद करून स्वयंसेवकांना समायोचित मार्गदर्शन केले. दुसरे प्रमुख पाहुणे डॉ. गणेश सुरजुसे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधत रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या सामाजिक जाणीवा आणि सेवाभावाचे महत्त्व पटवून दिले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी तथा कार्यक्रमाचे संयोजक प्रा. मंगेश जमदाडे यांनी महाविद्यालयाच्या रासेयो विभागाच्या वतीने वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रम अधिकारी डॉ. माधव कांडणगिरे यांनी सूत्रसंचालन करत राष्ट्रीय सेवा योजनेची भूमिका आणि महत्त्व स्पष्ट केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वयंसेवक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. प्रा. मंगेश जमदाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले



